ऐन पेरणीच्या तोंडावर डिझेलचा तुटवडा; चिखली तालुक्यातील मेरा चौकी येथे शेतकऱ्यांचा तीव्र ‘रस्ता रोको
चिखली (एकनाथ माळेकर):तालुक्यातील मौजे मेरा खुर्द येथील नायरा कंपनीच्या डिझेल आणि पेट्रोल पंपावर गेल्या दोन दिवसांपासून रांगेत उभे राहूनही डिझेल मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांचा अखेर उद्रेक झाला. हवालदिल झालेल्या बळीराजाने आज मेरा चौकी येथे जोरदार आंदोलन करत ‘रस्ता रोको’ केला.
ट्रॅक्टर पाण्यावर चालत नाही, डिझेल कुठून आणायचे? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
आजच्या आधुनिक युगात शेतीची मशागत, नांगरणी, रोटावेटर आणि पेरणीची कामे पूर्णपणे ट्रॅक्टरवर अवलंबून आहेत. ग्रामीण भागात बैलजोड्यांची संख्या कमी झाल्याने ट्रॅक्टरशिवाय पर्याय उरलेला नाही. “ट्रॅक्टर काही पाण्यावर चालत नाही, त्याला डिझेलच लागते,” अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली. एकीकडे शेतमालाला रास्त भाव मिळत नसताना, दुसरीकडे ऐन पेरणीच्या तोंडावर दोन-दोन दिवस डिझेलसाठी रांगेत उभे राहावे लागत असल्याने, “शेतकऱ्यांनी शेतात काम करायचे की डिझेलसाठी रांगेत उभे राहायचे?” असा संतप्त सवाल आंदोलकांनी प्रशासनाला विचारला.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांचा उद्रेक
या डिझेल टंचाईबाबत शेतकरी संघटनेने आठ दिवसांपूर्वीच तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन पूर्वकल्पना दिली होती. मात्र, शासनाने आणि प्रशासनाने याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध सुटला आणि त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.
प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलन, तीव्र इशाऱ्याचा इशारा
या रास्ता रोको आंदोलनात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दासा पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गणेश पाटील थुट्टे, विनोद पाटील थुट्टे, भागवत पाटील थुट्टे, शरद पाटील थुट्टे, विशाल पाटील थुट्टे, संदीप पाटील थुट्टे, श्रीकृष्ण पाटील थुट्टे, समाधान थुट्टे, दीपक गाडेकर, पवन शेटे, अंकुश देशमुख, आकाश पैठने, गणेश मधुकर थुट्टे यांच्यासह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.
“येत्या दोन दिवसांत जर डिझेल मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले नाही, तर यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा शेतकरी नेत्यांनी प्रशासनाला दिला आहे.
प्रशासनाचे आश्वासन आणि आंदोलन मागे
आंदोलनाची तीव्रता पाहता अंडेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार शंक्करगे साहेब आणि तहसीलदार गायकवाड साहेब यांनी तात्काळ आंदोलनस्थळी धाव घेतली. “आम्ही शासन दरबारी मागणी करून तुमचे सर्व प्रश्न तातडीने मार्गी लावू,” असे ठोस आश्वासन अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले. प्रशासनाच्या या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी आपले रस्ता रोको आंदोलन मागे घेतले. मात्र, डिझेल कधी उपलब्ध होते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
