भरोसा येथे अरुंद पांधन रस्त्यामुळे मक्याची ट्रॉली पलटी; शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे अतोनात नुकसानमुख्य वहिवाट बंद केल्याने उद्भवले संकट; महसूल विभाग घटनास्थळी दाखल, शासकीय दाव्यांचा उडाला फज्जा…

चिखली ( एकनाथ माळेकर): चिखली तालुक्यातील मौजे भरोसा येथे काल दिनांक २२ मे रोजी एक अतिशय दुर्दैवी घटना घडली. गावातील मुख्य वहिवाटीचा रस्ता बंद असल्यामुळे पर्यायी अशा अरुंद पांधन रस्त्यावरून जाताना मक्याने तुडुंब भरलेली ट्रॅक्टरची ट्रॉली उलटली. या भीषण अपघातात स्थानिक शेतकरी अरुण तेजराव थुटे यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. ऐन काढणीच्या हंगामात संपूर्ण पीक मातीमोल झाल्यामुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, भरोसा येथील प्रगतशील शेतकरी अरुण तेजराव थुटे यांनी आपल्या शेतातील मक्याची काढणी पूर्ण केली होती. हा मका बाजारात विक्रीसाठी नेण्याकरिता ट्रॅक्टर क्रमांक MH 28 CC 4321 च्या ट्रॉलीमध्ये भरण्यात आला होता. ट्रॅक्टर चालक मक्याने भरलेली ट्रॉली घेऊन भरोसा ते आंचरवाडी या मुख्य रस्त्याकडे निघाला होता.परंतु, भरोसा ते आंचरवाडी रस्त्याला लागून असलेल्या गट नंबर १३३ मधील शेतमालक अंबादास थुटे यांनी रस्त्यांच्या उत्तर दिशेची मुख्य वहिवाट (रस्ता) बंद केली असल्याचे प्रत्यक्षदर्शी व पंचांनी सांगितले. मुख्य रस्ता बंद असल्यामुळे चालकासमोर दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता.मुख्य रस्ता बंद असल्यामुळे ट्रॅक्टर चालकाला गट नंबर ३३३ च्या पश्चिम दिशेला असलेल्या अत्यंत अरुंद अशा कच्च्या पांधन रस्त्यावरून वाहन नेणे भाग पडले. ट्रॅक्टर चालक अतिशय शिताफीने वाहन पुढे नेत असतानाच, उत्तरेकडील आंचरवाडी मुख्य रोडवर (सडकेवर) चढताना अरुंद जागेमुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. चढणीवर ट्रॅक्टरची गती आणि वजनाचा समतोल बिघडल्याने मक्याची संपूर्ण ट्रॉली रस्त्यावरच पलटी झाली. ट्रॉली उलटताच मक्याची सर्व पोती फाटून हजारो किलो मका रस्त्यावरील मातीत आणि चिखलात पसरला, ज्यामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. ग्रामस्थांची धावया अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच गावातील शेतकरी व ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. याप्रसंगी उद्धव थुटे, मल्लू हटकर, विशाल थुटे, सागर कवळे, अमोल थुटे आणि नंदकिशोर थुटे यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. घटनेचे गांभीर्य ओळखून महसूल विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीची पाहणी करून नुकसानीचा प्राथमिक पंचनामा केला आहे.”शेतकरी आज आधीच आसमानी आणि सुलतानी अशा दोन्ही संकटांशी निकराने लढत आहे. अशातच शेत रस्ते आणि पांधन रस्ते मोकळे करण्याचे शासकीय दावे केवळ कागदावरच उरले असून, त्याचा भरोसा येथे साफ फज्जा उडाला आहे,” असा तीव्र संताप उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला. याप्रकरणी बंद असलेले रस्ते प्रशासनाने तात्काळ मोकळे करावेत आणि बाधित शेतकऱ्याला त्वरित शासकीय मदत द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
