बळीराजावर पुन्हा संकट!’ लोणारच्या भुमराळा शिवारात चोरांचा धुमाकूळ; सौर पंपाची केबल जाळून लंपास….

0
Screenshot_2026-06-10-06-40-58-05_680d03679600f7af0b4c700c6b270fe7

लोणार (एकनाथ माळेकर)अगोदरच नैसर्गिक संकटांशी सामना करणाऱ्या बळीराजाला आता चोरट्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. लोणार तालुक्यातील मौजे भुमराळा शिवारात भुरट्या चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, गट नंबर १९२ मधील शेतकरी रामेश्वर आघाव यांच्या शेतातील सौर ऊर्जा मोटारीची सुमारे ११० फूट केबल जाळून चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी रामेश्वर आघाव हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील पिकांना सौर ऊर्जेवर चालणाऱ्या मोटारीद्वारे पाणी देतात. ८ जून २०२६ रोजी संध्याकाळी ६ वाजता शेतातील कामे आटोपून ते घरी परतले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी (९ जून) सकाळी ९ ते ९:३० च्या सुमारास जेव्हा ते पुन्हा शेतात पोहोचले, तेव्हा त्यांना त्यांच्या सौर पंपाची केबल गायब असल्याचे दिसले.चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी केली आहे. केबल सहजपणे नेता यावी यासाठी त्यांनी ती शेतातच जाळली आणि त्यातील मौल्यवान तांब्याच्या तारा काढून नेल्या. या चोरीमुळे शेतकऱ्याचे अंदाजे ४ हजार रुपयांचे थेट आर्थिक नुकसान झाले असून, आता नवीन केबल टाकण्याशिवाय त्यांना पर्याय उरलेला नाही.शेतकरी वर्ग सध्या पेरणीच्या तयारीसह पिकांच्या नियोजनात व्यस्त असतानाच अशा प्रकारे होणाऱ्या चोरीमुळे पिकांचे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. “एक तर निसर्गाचा लहरीपणा आणि त्यात आता या भुरट्या चोरांचा सुळसुळाट, आम्ही जगायचे कसे?” असा सवाल संतप्त शेतकरी विचारत आहेत.भुमराळा परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकरी दहशतीखाली आहेत. या चोरांचा त्वरित बंदोबस्त करावा आणि संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी रामेश्वर आघाव यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.आता लोणार पोलीस या प्रकरणी काय पावले उचलतात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!