साखळी बुद्रुक येथे पाणीटंचाईचा भडका; ग्रामपंचायतीच्या कारभाराविरुद्ध माजी सरपंचांचे आमरण उपोषण…
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):साखळी बुद्रुक (ता. जि. बुलढाणा) येथील ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे गावकऱ्यांना पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या निषेधार्थ, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सौ. विजया अनिल कोळसे यांनी आज, १० जून २०२६ पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.साखळी बुद्रुक येथील पाणीपुरवठ्याची समस्या गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर बनली आहे. याबाबत ग्रामस्थांनी २८ मे २०२६ रोजी ग्रामपंचायतीला पत्र दिले होते. त्यानंतर ५ जून रोजीही प्रशासनाला या समस्येची दखल घेण्याबाबत लेखी अर्ज देण्यात आला होता. त्यावेळी ग्रामपंचायतीकडून ८ ते १० दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ठोस आश्वासन देण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात हे काम अत्यंत संथ गतीने आणि ‘कासवगतीने’ सुरू असल्याचे पाहून संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.निवेदनात नमूद केल्यानुसार, वारंवार आश्वासने देऊनही पाणीटंचाई कायम असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याने सौ. विजया अनिल कोळसे यांनी लोकशाही मार्गाने आमरण उपोषणाचा मार्ग निवडला आहे.”आम्ही आजपासून आमरण उपोषणाला बसलो आहोत. या कालावधीत काहीही अनुचित प्रकार घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी स्थानिक प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाची राहील,” असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या उपोषणाला गावातील समाधान हिवाळे. मा.जि.प. सदस्य बुलढाणा,शंकरशेठ चौधरी मा.पं.स. सदस्य बुलडाणा सुरेशभाऊ उगले,रमेश वाघमार,गुरुदत्त बापू देशमुख,दिनकर भाऊ जाधव,अन्मार शेठ,कासाबाई वाघमारे, विजय हिवाळे, सुनील आराख, प्रकाश मोरे, सरदार शहा,नारायण सोनुने, श्रीकांत देशमुख, मदन आराख, नाजुकराव देशमुख, सोमनाथ हिवाळे, सय्यद बब्बू सय्यद सांडू,इतर ग्रामस्थांनीही आपला पाठिंबा दर्शविला आहे.
