रक्षकच बनले भक्षक जळगाव येथील गाई व बैल चोरी मधील आरोपींना पोलीस घालताहेत पाठीशी ? तपास अधिकारी बदलण्याची शेतकऱ्याची मागणी …

0
Spread the love

सिंदखेडराजा (एकनाथ माळेकर बुलढाणा माझा न्युज) सिंदखेडराजा स्थानिक पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या जळगांव येथील एका युवा शेतकऱ्याचे बैल दि. २१ एप्रिल रोजी शेतातून चोरी गेले आहेत. त्याची नोंदही पोलिसांत झाली, नव्हेतर चोरीतील आरोपींचा सुगावा लागणाऱ्या बाबी शेतकऱ्याने पोलिसांना दिल्या आहेत. त्यातून लवकर तपास करीत आरोपींना अटक होऊन शेतकऱ्याचे बैल लवकर मिळावेत अशी परिस्थिती असतांनाही तपासात टाळाटाळ केल्या जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी व ठाणेदार यांनी निर्देश देऊनही त्याकडे बीट जमादार दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. यातून आरोपींना पाठीशी तर घालण्यात येत नसावे ना? असा प्रश्न परीसरात चर्चिला जात आहे.

तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी सौंदा जगन्नाथ डिघोळे (वय ४२) यांचा एक बैल व दोन दुधाळ गाई शेतात बांधलेले असतांना दि. २१ एप्रिलच्या मध्यरात्री चोरी झाली. दि. २२ एप्रिल रोजी सकाळी सौंदा डिघोळे हे शेतात गेले असता गाई व बैल चोरीला गेल्याचा हा प्रकार उघडकीस आला.
शेजारुनच समृद्धी महामार्ग जातो. चोरट्यांनी तेथे एखादे वाहन उभे करुन गाई व बैल त्यातून नेण्यात आले असावेत असा कयास आहे. घटनास्थळा जवळच तक्रारदार शेतकऱ्याला एक पॅन कार्ड तसेच पिंपळखुंटा येथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका व्यक्तीचा फोटो सापडला आहे. एवढे सगळे असूनही तपास करणाऱ्या बीट जमादार यांनी अद्याप कुठलीच कारवाई केली नाही. अगतिक झालेले फिर्यादी शेतकरी डिघोळे हे वेळोवेळी सबंधित बीट जमादार यांना भेटतात. पण आपण तपास कसा करीत आहोत? ह्याच फुशारक्या ते प्रत्येकवेळी मारतात.
यासंदर्भात पोलीस उपविभागीय अधिकारी व ठाणेदार यांना वेगळी सांगितले असता, त्यांना सूचना देतो, एवढेच सांगतात. चोरी होवून पंधरा दिवस झाले व चैकशीला दिशा देणारे पुरावेही हाती लागले असूनही, पोलीस संशयितांना साधे चौकशीलाही बोलवत नाही. त्यामुळे पोलीस जमादार व आरोपींचे काही तरी लागेबांधे असावेत, अशा आरोप युक्त चर्चा फिर्यादी व ग्रामस्थांमध्ये होत आहेत. त्यामुळे बीट जमादारांकडून तपास काढून घेत, कार्यक्षम तपास अधिकारी नेमावा व चोरट्यांना वेळीच जेरबंद करीत न्याय द्यावा, अशी मागणी सौंदा डिघोळे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed