अंत्री कोळीमध्ये पाणीटंचाईचा कहर, 2 किमी जाऊन परक्या विहिरीवर धुणी-भांडी; 15 दिवसांपासून गाव कोरडे ठाक
चिखली (एकनाथ माळेकर):-तालुक्यातील अंत्री कोळी गावात भीषण पाणीटंचाईने हाहाकार उडाला आहे.तीन महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा सुरू होता, मात्र मागील 15 दिवसांपासून नळाला थेंबभरही पाणी येत नसल्याने ग्रामस्थांची दयनीय अवस्था झाली आहे. गावातील महिलांना कपडे धुण्यासाठी व पिण्याचे पाणी आणण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करून ‘भेटेल त्या विहिरीवर’ जावे लागत आहे. वस्तुस्थिती अशी की, गावात नळाला पाण्याचा थेंबही नसल्याने महिला-भगिनींना दरोज 2 किलोमीटर दूर असलेल्या शेतातील, माळरानावरील परक्या विहिरीवर जाऊन कपडे धुवावे लागत आहेत व तेथूनच डोक्यावर हंडे भरून पिण्याचे पाणी आणावे लागत आहे.जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शाळेच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.”आमचा गावचा माणूस पंचायत समिती चिखली येथे BDO समाधान वाघ आहे, आणि गावात सरपंच (प्रशासक)सुभाष ठेंग यांची समिती कार्यरत आहे, तरी आमच्यावर 2-2 किलोमीटर पायपीट करून परक्या विहिरीवर पाण्यासाठी वणवण फिरायची वेळ आली. तीन महिने आम्ही कसेबसे नळाला पाणी येत होते त्यात आम्ही भागवत होतो, पण आता चक्क 15 दिवसांपासून तर पूर्णच कोरडा पडलाय नळाला थेंब ही नाही अशी व्यथा ग्रामस्थाने नाव न छापण्याच्या अटीवर बोलून दाखवली.कायमस्वरूपी उपाय सुचवला या समस्येवर ग्रामस्थांनी ठोस उपाय सुचवला आहे. वाघापूर येथील विहिरीला मुबलक पाणी उपलब्ध आहे. त्या विहिरीपासून अंत्री कोळी गावापर्यंत तातडीने पाईपलाईन टाकून नळाद्वारे पाणीपुरवठा सुरू केल्यास हा प्रश्न कायमचा निकाली निघू शकतो.
लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे: यासोबतच *मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले यांनीही अंत्री कोळी गावाकडे लक्ष द्यावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
ग्रामस्थांची मागणी: प्रशासनाने वाघापूरच्या विहिरीतून पाईपलाईनद्वारे तात्काळ पाणीपुरवठा सुरू करावा व जलजीवन मिशन अंतर्गत ही योजना कायमस्वरूपी कार्यान्वित करावी. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
सरपंचांची प्रतिक्रिया: याबाबत सरपंच सुभाष ठेंग यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, *”वाघापूरच्या विहिरीतून पाईपलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर चालू करणार आहे. येत्या तीन ते चार दिवसात गावकऱ्यांना पाणी मिळेल.”
गटविकास अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया: समाधान वाघ, गटविकास अधिकारी, पंचायत समिती चिखली यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.
