लोणारच्या ऐतिहासिक दैत्यसूदन मंदिरात दिव्य ‘किरणोत्सव’ सुरूखगोलशास्त्र आणि प्राचीन वास्तुकलेचा अद्भूत संगम; भाविक अन् पर्यटकांची गर्दी….

0
IMG-20260516-WA0003

लोणार (यासीन शेख):जागतिक वारसा लाभलेल्या लोणार विवर सरोवर परिसरातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या दैत्यसूदन मंदिरात १५ मेपासून दिव्य किरणोत्सवाला सुरुवात झाली आहे. तब्बल हजार वर्षांची परंपरा लाभलेल्या या प्राचीन मंदिरात सलग चार ते पाच दिवस सूर्यकिरणे थेट भगवान विष्णूंच्या मूर्तीवर पडत असल्याने भाविकांमध्ये मोठे कुतूहल आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. या अनोख्या सोहळ्यामुळे सध्या संपूर्ण लोणार शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.लोणार शहर हे जागतिक स्तरावर केवळ विवर सरोवरामुळे प्रसिद्ध नसून, येथील प्राचीन मंदिरेही इतिहास आणि स्थापत्यकलेचा अनमोल ठेवा मानली जातात. त्यामधील दैत्यसूदन मंदिर हे आपल्या अप्रतिम दगडी कोरीव कामासाठी विशेष प्रसिद्ध आहे. भगवान विष्णूंच्या दैत्यसूदन अवताराला समर्पित असलेल्या या मंदिराची वास्तुरचना आणि कोरीव कलाकुसर थेट ओडिसा येथील कोणार्क सूर्य मंदिराची आठवण करून देणारी असल्याचे अभ्यासक सांगतात.विशेष म्हणजे, मंदिराची उभारणी करताना प्राचीन स्थापत्यविशारदांनी सूर्याच्या दिशेचा आणि प्रकाशाच्या कोनांचा अत्यंत अचूक अभ्यास केला होता. त्याचाच प्रत्यय दरवर्षी मे महिन्यात येणाऱ्या किरणोत्सवादरम्यान अनुभवायला मिळतो. १५ मेपासून सलग चार ते पाच दिवस म्हणजेच ‘झिरो सावली दिना’च्या सुमारास, जेव्हा सूर्य थेट माथ्यावर असतो, तेव्हा सकाळी ११ ते दुपारी १२.५० वाजेच्या दरम्यान सूर्यकिरणे मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून थेट भगवान दैत्यसूदनांच्या मूर्तीवर पडताना दिसतात.या प्रसंगी सूर्यकिरणे मूर्तीवर केंद्रित होतात आणि त्यातून निर्माण होणारा दृश्य अनुभव अद्वितीय असतो. मंदिरातील शस्त्रधारी काळ्या पाषाणातील विष्णुमूर्ती आणि तिच्या पायांखाली असलेल्या लवणासुर राक्षसाच्या वधाचे दृश्य, हे किरणोत्सवात विशेष आकर्षण ठरत आहे. वास्तुकला आणि खगोलशास्त्र यांची सांगड घालणारा हा उत्सव दरवर्षी साक्षात सूर्यपूजनाचा अनुभव देतो.गेल्या दोन-तीन वर्षांत या किरणोत्सवाची माहिती सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमुळे राज्यभर पोहोचल्यामुळे या सोहळ्याचे आकर्षण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पूर्वी फारशी प्रसिद्धी नसलेला हा उत्सव आता लोणारमधील धार्मिक पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू बनत आहे. हा दृश्यानुभव पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक, पर्यटक आणि इतिहासप्रेमी लोणारमध्ये दाखल होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!