राजुरा धरण परिसरात खळबळ: वडिलांच्या एका प्रश्नाने घेतला ५ जणांचा बळी; वाचा काय घडला अनर्थ?​क्रूर नियती! आधी खेळत्या वयाच्या ४ मुलांना विहिरीत फेकले; नंतर पित्याचीही उडी, संपूर्ण गाव हादरले….

0
1779720445545

जळगाव जामोद ( बुलढाणा माझा न्युज ):घरगुती वाद आणि असह्य मानसिक तणावातून एका बापाने आपल्या चार लहान मुलांना विहिरीत ढकलून देऊन स्वतःही मृत्यूला कवटाळल्याची धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात रविवारी सकाळी उघडकीस आली. या सामूहिक आत्महत्येच्या थराराने संपूर्ण बुलडाणा जिल्हा हादरून गेला असून, एकाच विहिरीत ५ मृतदेह आढळून आल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.विजय मुसा किराडिया (रा. भाले अंजन, ता. जळगाव जामोद) असे आत्महत्या करणाऱ्या पित्याचे नाव आहे. या घटनेत प्रित विजय किराडिया (वय ७ वर्षे), प्राची विजय किराडिया (वय ५ वर्षे), पूर्वी विजय किराडिया (वय ४ वर्षे) आणि अवघ्या २ वर्षांचा पियुष विजय किराडिया या चार निष्पाप भावंडांचा दुर्दैवी अंत झाला आहे.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत विजय किराडिया याचे त्याच्या पत्नीसोबत काही दिवसांपूर्वी घरगुती कारणावरून वाद झाले होते. या वादातून संतापून पत्नी माहेरी निघून गेली होती. रविवारी सकाळी विजय घरात काम करत असताना त्याचे वडील तिथे आले. “तू स्वतः घरातील काम का करतोयस? तुझी बायको कुठे गेली?” असा प्रश्न वडिलांनी विजयला विचारला. आधीच पत्नी सोडून गेल्याच्या मानसिक तणावात असलेल्या विजयच्या मनावर या प्रश्नाने मोठा आघात केला आणि त्याने थेट टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला.विजय रविवारी सकाळी आपल्या चारही निष्पाप मुलांना सोबत घेऊन राजुरा धरण परिसरातील एका शेतातील विहिरीवर गेला. तेथे त्याने खेळत्या वयातील आपल्या चारही मुलांना एकापाठोपाठ एक विहिरीच्या खोल पाण्यात ढकलून दिले. मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची खात्री पटल्यानंतर विजयने स्वतःही विहिरीत उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. रविवारी सकाळी विहिरीमध्ये मृतदेह तरंगताना दिसताच हा सर्व थरार उघडकीस आला.घटनेची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अत्यंत शिताफीने विहिरीतून पाचही जणांचे मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळाचा रीतसर पंचनामा करून सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या घटनेमुळे भाले अंजन गावासह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली असून, जळगाव जामोद पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.

या हृदयद्रावक घटनेत बळी पडलेल्या मुलांचे वय अवघे २ ते ७ वर्षे होते. आई-वडिलांमधील अंतर्गत वाद काय असतो, याची पुसटशी कल्पनाही या चिमुकल्यांना नव्हती. वडिलांचा हात धरून विहिरीवर जाताना आपल्याला मृत्यूच्या दारात ढकलले जात आहे, हे न समजण्याइतकी ही बालके निष्पाप होती. “त्या निष्पाप चिमुकल्यांचा काय दोष होता?” असा संतप्त व भावनिक सवाल उपस्थित करत घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!