छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी चिखला काकड येथे आमरण उपोषण; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाही, प्रशासनासमोर पेच…

0
IMG-20260611-WA0034

लोणार(रघुनाथ आघाव ) लोणार तालुका तालुक्यातील चिखला काकड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्या जागेसाठी ग्रामपंचायतीमार्फत कायमस्वरूपी आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी गावातील सुमारे २०० महिला-पुरुषांनी सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरूच असून अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला असून या आंदोलनाकडे तालुक्यासह जिल्हा आणि राज्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.उपोषणकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, सध्या उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक फायबरचे असून ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. मान्सूनपूर्व काळात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांमुळे स्मारकाला धोका निर्माण झाला असून ते केव्हाही नुकसानग्रस्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्मारक तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.यापूर्वीही या विषयावर गावात वाद निर्माण झाला होता. भविष्यात पुन्हा कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत सर्वानुमते योग्य जागा निश्चित करून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य, सुरक्षित आणि कायमस्वरूपी स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. तसेच संबंधित जागा ग्रामपंचायतीच्या अभिलेखात कायमस्वरूपी आरक्षित करून स्मारकाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाने स्वीकारावी, अशीही त्यांची मागणी आहे.”छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्तानचे दैवत आहेत. त्यांच्या स्मारकाची अवहेलना अथवा दुर्लक्ष कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून स्मारकाच्या सुरक्षिततेबाबत ठोस निर्णय घ्यावा आणि लेखी स्वरूपात आश्वासन द्यावे,” अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली.दरम्यान, काल सायंकाळी लोणारचे तहसीलदार भुषण पाटील, निवासी तहसीलदार रामप्रसाद डोळे, गटविकास अधिकारी देशमुख तसेच विस्तार अधिकारी चणखोरे यांनी उपोषणकर्त्यांसोबत चर्चा केली. प्रशासनाकडून विविध पर्यायांवर विचारविनिमय करण्यात आला; मात्र ही चर्चा निष्फळ ठरली. उपोषणकर्त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतल्याने कोणताही सामंजस्याचा मार्ग निघू शकला नाही.उपोषण सुरू झाल्यापासून आंदोलनस्थळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत असून आंदोलनाला गावकऱ्यांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. उपोषणकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुरक्षित स्थळी स्थलांतरित करून त्याच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासन स्वीकारत नाही, तोपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही.”दरम्यान, मध्यरात्री काही उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी काहींना बुलढाणा येथील रुग्णालयात तर दोघांना पुढील उपचारांसाठी जालना येथे हलविण्यात आल्याचे समजते. उपोषणाचा कालावधी वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली असून आंदोलनकर्त्यांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.दुसऱ्या दिवशीही कोणताही ठोस निर्णय न झाल्याने चिखला काकड येथील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी आंदोलन शांततापूर्ण मार्गाने सुरू आहे. प्रशासन या प्रश्नावर नेमकी कोणती भूमिका घेते, ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेतला जातो आणि उपोषणाचा शेवट कसा होतो, याकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्यातील शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!