शेतकऱ्यांनी बियाणे उगवण क्षमता तपासणी करावी कृषि विभगाचे आवाहन….

0
Spread the love

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज) येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांमध्ये प्रत्येक वर्षी नवीन बियाणे खरेदी करुनच पेरणी करावी, असा समज आहे. परंतू सोयाबीन, मूग, उडीद, चवळी, हरभरा, भुईमुग, गहू या पिकांमध्ये स्वपरागसिंचन होत असल्याने कोणतेही संकरीत वाण या पिकांमध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे सरळ वाणांचे बियाणे एकदा विकत घेतल्यानंतर त्यापासून तयार होणारे पिक आपण पुढे दोन वर्ष बियाणे म्हणून वापरु शकतो. त्यामुळे अनावश्यकपणे बाजारामधून दरवर्षी बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्याचबरोबर बाजारातून विकत आणलेले महागडे बियाणे उगवण आले नसल्यामुळे पेरणीकरीता वापरलेली खते, मनुष्यबळ आदी वाया जाते. तसेच लेखी तक्रार, पंचनामा यामुळे पेरणीचा कालावधी निघून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे कंपनीचे विकत घेतलेले बियाणे असले तरी बियाणे उगवण क्षमता तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणे करावी.

उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या पद्धती आहेत. यात गोणपाट वापरुन बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन घ्यावे. गोणपाटाचे सहा चौकोनी तुकडे घेऊन स्वच्छ धुवून घ्यावे. एक तुकडा जमिनीवर पसरावे. पोत्यातून काढलेल्या धान्यातून सरसकट १०० दाणे मोजून दीड-दोन सेंमी अंतरावर साधारणपणे बोटाचे एक कांड अंतरावर १०-१०च्या रांगेत गोणपाटाच्या एक तुकड्यावर ओळीत ठेवावे. अशा प्रकारे १०० दाण्याचे ३ नमुने तयार करावेत. गोणपाटावर चांगले पाणी शिंपडून ओले करावे. बियाण्यांवर दुसरा गोणपाटाचा तुकडा अंथरुन पुन्हा चांगले पाणी मारावे. गोणपाटाच्या तुकड्याची बियाण्या सकट गुंडाळी करुन थंड ठिकाणी सावलीत ठेवावे. त्यावर अधून-मधून पाणी शिंपडून ओले ठेवावे. ६-७ दिवसानंतर ही गुंडाळी जमिनीवर पसरुन उघडावे. चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजावेत. तिनही गुंडाळ्याची सरासरी काढून १०० दाण्यांपैकी ७० किंवा त्यापेक्षा जास्त दाणे, जर चांगले कोंब आलेले असतील तर बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. उगवण झालेल्या बियाण्याची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असेल तर एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावे. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशक आणि जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.

वर्तमान पत्राचा कागद वापरून बियाणांची उगवण क्षमता तपासता येते. यासाठी वर्तमानपत्राचा एक कागद घेऊन त्याच्या चार घड्या पाडाव्यात, त्यामुळे कगदाची जाडी वाढेल नंतर तो पुर्ण कागद पाण्याने ओला करावा. प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून वर्तमानपत्राच्या टोकाच्या भागावर ठेवून त्याची गुंडाळी करावी. अशारितीने शंभर बियांच्या दहा गुंडाळ्या तयार कराव्यात. त्या गुंडाळ्या पॉलिथिन पिशवीत चार दिवस तशाच मोजावे. चार दिवसानंतर त्यामधील अंकुर मोजावेत.

पाण्यात भिजवून कमी वेळात उगवण तपासणीसाठी बियाण्याच्या प्रत्येक पोत्यातून खोलवर हात घालून मुठभर धान्य बाहेर काढावे. सर्व पोत्यातून काढलेले धान्य एकत्र करुन त्या नमुन्यातून १०० दाणे मोजून वेगळे काढावे, असे १०० दाण्यांचे ३ संच तयार करावे. शक्यतो काचेच्या तीन ग्लासात पाणी घेऊन त्यात हे १०० दाणे टाकावे. ५ ते ७ मिनीट तसेच राहू द्यावे. त्यानंतर पाणी फेकुन देऊन दाणे वेगळे काढून त्यामधील पूर्णतः फुगलेले, तसेच बियाण्याच्या टरफलावर सुरकुत्या पडलेले दाणे वेगळे करावे. दोन्ही प्रकारच्या दाण्यांची संख्या मोजून घ्यावी. दाणा ५६ मिनीट पाण्यात ठेवल्यानंतर चांगला टम्म फुगल्यास पेरणीसाठी अयोग्य असतो. अशा बियाण्यांच्या टरफलाला इजा झालेली असल्याने किंवा बिजांकूर कुजल्यामुळे त्यामध्ये पाणी लवकर आत शिरते. तो लवकर फुगतो. मात्र जे बियाणे चांगले असते त्याचे टरफल शाबुत असल्यामुळे त्याच्यात पाणी आत शिरत नाही, फक्त टरफलातून पाणी आत गेल्यामुळे त्यावर सुरकुत्या पडल्यासारखे दिसते. १०० दाण्यांपैकी जर सरासरी ७० किंवा जास्त दाणे अशाप्रकारे न फुगलेले, सुरकुत्या न पडलेले असल्यास बियाणे बाजारातील बियाण्यासारखेच गुणवत्तेचे आहे, असे समजावे आणि शिफारशीप्रमाणे मात्रेत पेरणीसाठी वापरावे. उगवण झालेल्या बियाण्यांची सरासरी संख्या ७० पेक्षा कमी असल्यास एकरी बियाण्यांचे प्रमाण थोडे वाढवून पेरणी करावी. पेरणी करताना बियाण्यास बुरशीनाशकांची व जिवाणू संगर्धकाची प्रक्रिया करणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed