लोणार तालुक्यात रेती वाहतुकीचा थरार; निष्पाप नागरिकांच्या बळीची प्रशासन वाट पाहतंय का?ओव्हरलोड वाहनांमुळे अपघातांचे सत्र; विना नंबर प्लेट वाहनांची ‘बीबी’ परिसरात दहशत….
बीबी ( बुलढाणा माझा न्युज ) :लोणार तालुक्यातील सावरगाव तेली रेती घाटावरून होणारी रेती वाहतूक सध्या सर्वसामान्यांसाठी मृत्यूचा सापळा बनली आहे. क्षमतेपेक्षा जास्त रेती भरून सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे बीबी आणि परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, एखादा मोठा अनर्थ घडल्यावरच प्रशासनाला जाग येईल का? असा जळजळीत प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.सावरगाव तेली परिसरातून रेती घेऊन जाणारी वाहने अत्यंत बेजबाबदारपणे चालविली जात आहेत. ओव्हरलोड रेतीमुळे ही वाहने रस्त्याने धावताना पाठीमागे रेती सांडत चालतात. वाऱ्यामुळे ही रेती मागून येणाऱ्या दुचाकीस्वारांच्या डोळ्यात जात असल्याने अनेक लहान-मोठे अपघात घडले आहेत. अनेक वाहनधारकांना यामुळे कायमचे अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे.महसूल आणि पोलीस प्रशासनाचे डोळे पुसण्यासाठी या रेती माफियांनी नवीन शक्कल लढवली आहे. वाहतूक करणाऱ्या बहुतांश वाहनांना नंबर प्लेटच नाहीत, तर ज्यांना आहेत त्यांनी त्या जाणीवपूर्वक पुसट केल्या आहेत. जेणेकरून अपघात झाल्यास किंवा तक्रार करायची असल्यास वाहनाची ओळख पटू नये. रात्रंदिवस सुरू असलेल्या या अवैध प्रकाराकडे संबंधित विभागाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक वाहनांकडे वैध रॉयल्टी नसते. चुकून एखादे वाहन तपासणीसाठी थांबवले तरी, जुन्या पावत्या दाखवून किंवा कागदपत्रांची जुळवाजुळव करून अर्थपूर्ण तडजोडीअंती वाहन सोडून दिले जाते. या प्रकारामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.या बेकायदेशीर वाहतुकीवर तात्काळ बंदी घालावी, रात्रीची वाहतूक थांबवावी आणि बीबी परिसरात कायमस्वरूपी तपासणी पथक तैनात करावे, अशी मागणी होत आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले असून, कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशाराही देण्यात आला आहे.
