केंद्र शासनाच्या योजनांचा केंद्रीय आयुष व कुटूंब कल्याण राज्यमंत्री यांनी घेतला आढावा; योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा – ना. प्रतापराव जाधव…
बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज) केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचवावा, असे निर्देश केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री तथा ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष प्रतापराव जाधव यांनी दिले. बुलढाणा जिल्ह्यातील केंद्रीय योजनांच्या प्रगती आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीची बैठक जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार ना. प्रतापराव जाधव हे होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॅा. प्रविणकुमार देवरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, यांच्यासह उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जल व्यवस्थापन कृती पंधरवडा मोहिमेअंतर्गत जलकुंभ पूजन केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पाण्याच्या काटकसरी वापराबाबत उपस्थितांना जलप्रतिज्ञा देण्यात आली. केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाचा आढावा घेतला. यावेळी सिंचन प्रकल्पबाधीतांच्या पुनर्वसन आणि भूसंपादन प्रक्रियेची माहिती घेतली. यात भूसंपादन प्रक्रियेबद्दल लोकांच्या तक्रारींचे निराकरण करावे. बुडीत क्षेत्रातील बाधीतांचे ज्या ठिकाणी पुनर्वसन केले जात आहे त्या ठिकाणी रस्ते, पाणी, वीज आदी पायाभूत सुविधा उपलब्ध करुन द्यावे. यासह जिगांव सिंचन प्रकल्पातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करावे. पुनर्वसन गावांना प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. यावेळी ना. प्रतापराव जाधव यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा आढावा घेतला. 2024-25 वर्षात खरीप आणि रब्बी हंगामांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सुमारे 5 लाख 88 हजार 428 शेतकऱ्यांना 712 कोटी रुपये रक्कमेचा पीक विमा नुकसान भरपाई वितरित करण्यात आले आहे. या शिवाय सन 2025-26 खरीप व रब्बी हंगामातील पीक विम्याची प्रक्रिया सुरु असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. तसेच 3 लाख 53 हजार 512 लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाली असून 2 हजार 495 प्रलंबित आहे, अशी माहिती कृषी विभागाने दिली. त्याबाबत ई-केवायसी तसेच मयत झालेल्या व वारसा हक्क अभावी या योजनेचा लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना संपर्क करुन त्यांना योजनेचा लाभ द्यावा. यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सेवाकांनी गावनिहाय भेटी देवून कृषी योजनांची माहिती व त्याचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. तसेच शेतीमध्ये पिकविले जाणारे पिकांची पारदर्शकपणे नोंद घेऊन पिक विमा, नुकसान भरपाईचा लाभ मिळवून द्यावा. अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करा त्यांचे प्रश्न सोडवा, असे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी दिले. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेंतर्गंत शेतकऱ्यांना दिवसा विज मिळावी यासाठी आवश्यक ते उपाययोजना करावे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. या आहाराची नियमितपणे तपासणी करुन चांगल्या प्रतीचा आहार विद्यार्थ्यांना मिळेल याची खात्री करावी. सीएससी सेंटर, आधार सेवा केंद्रांवर नागरिकांची लुट सुरु असल्याच्या तक्रारी असून अशा केंद्रांची तपासणी करा, आढावा घेवून कारवाई करा, अशा सूचना केंद्रीय राज्यमंत्री ना. प्रतापराव जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. या बैठकीत ना. प्रतापराव जाधव यांनी प्रधानमंत्री सुर्यघर योजना, मनरेगा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, १५ वा केंद्रीय वित्त आयोग, गृहनिर्माण योजना, जलजीवन मिशन, अटल भूजल योजना, मजीप्रा, पाणी टंचाई निवारनार्थ उपयोजना, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय आरोग्य योजना, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना, कौशल्य विकास योजना, पीएम श्री शाळा, डिजिटल इंडिया, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे प्रकल्प, नगरपरिषदेच्या योजना, नवीन शैक्षणिक प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.
