सिंदखेडराजा उपविभागात २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे होणार नियमानुकूल​प्रशासनाकडून विशेष मोहीम; पात्र नागरिकांना अर्ज करण्याचे आवाहन​….

0
IMG-20260423-WA0057

सिंदखेडराजा (अनिल दराडे):महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने २६ मार्च २०२६ रोजी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार, १ जानेवारी २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने सिंदखेडराजा उपविभागात विशेष मोहीम राबविण्यात येत असून, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी यासंदर्भात आढावा बैठक घेऊन यंत्रणेला गती देण्याचे निर्देश दिले आहेत.​वर्षानुवर्षे अतिक्रमित जागेवर राहणाऱ्या कुटुंबांना या निर्णयामुळे हक्काच्या घराची कायदेशीर मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.​अशी असेल अर्जाची प्रक्रिया:शासकीय निर्णयानुसार, ग्रामीण आणि शहरी भागासाठी स्वतंत्र समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी त्यांचे अर्ज खालीलप्रमाणे सादर करायचे आहेत:​शहरी भाग (नगरपालिका क्षेत्र): नागरिकांनी आपले अर्ज संबंधित नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सादर करावेत. नगरपालिका स्तरावर उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती यावर निर्णय घेईल.​ग्रामीण भाग: ग्रामीण भागातील नागरिकांनी आपले अर्ज संबंधित ग्रामसेवकांकडे द्यावेत. हे अर्ज गटविकास अधिकाऱ्यांमार्फत (BDO) तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर केले जातील.​पुराव्यांसह अर्ज करण्याचे आवाहन:या मोहिमेअंतर्गत घरांना कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी नागरिकांनी २०११ पूर्वीपासून वास्तव्यास असल्याबाबतचे आवश्यक कागदपत्रे व पुरावे अर्जासोबत जोडणे अनिवार्य आहे. ही एक मोठी संधी असल्याने जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.​प्रशासकीय यंत्रणा सज्ज:नुकत्याच पार पडलेल्या आढावा बैठकीस सिंदखेडराजाचे तहसीलदार अजित दिवटे, देऊळगाव राजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, मुख्याधिकारी अरुण मोकळ, गटविकास अधिकारी मुकेश माहोर, भूमी अभिलेख विभागाचे के. पी. भुईर व रचना जाधव, विस्तार अधिकारी बी. डी. घुगे यांच्यासह सर्व मंडळ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शासन निर्णयाची सविस्तर अंमलबजावणी करण्याबाबत व अर्जांची छाननी वेळेत करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!