वरवंडमध्ये लोकशाहीचा विजय! प्रशासनाची नमती भूमिका, गावातील शासकीय जागेवर आता कोंडवाडाच बांधणार…..
बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ): वरवंड येथील पशूंसाठी आरक्षित असलेल्या कोंडवाड्याच्या जागेवर तलाठी कार्यालयाचे बांधकाम करण्याच्या निर्णयाला ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविला होता. वरवंड येथील शेतकरी प्रकाश जेउघाले यांनी या विरोधात १ मे (महाराष्ट्र दिन) रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र, प्रशासनाने या मागणीची गंभीर दखल घेत गावातील शासकीय जागेवर कोंडवाडाच बांधण्याचे लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन आता मागे घेण्यात आले आहे.वरवंड गावातील पशूंसाठी असलेल्या जुन्या कोंडवाड्याच्या (कोंडवाडा) जागेवर प्रशासनाकडून तलाठी कार्यालयाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते. गावकऱ्यांच्या मते, मोकाट जनावरांच्या प्रश्नामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून गावात कोंडवाड्याची अत्यंत गरज आहे. ही गरज ओळखून प्रकाश जेउघाले यांनी मार्च २०२६ पासून सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, दखल न घेतली गेल्याने त्यांनी शेवटी आत्मदहनाचा इशारा दिला होता.३० एप्रिल रोजी ग्रामपंचायत अधिकारी, प्रशासक आणि समिती सदस्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रशासनाने नमती भूमिका घेत मान्य केले की, आगामी मासिक सभा आणि ग्रामसभेत निर्णय घेऊन १५ व्या वित्त आयोगाच्या आराखड्यात बदल केला जाईल. व गावातील शासकीय जागेमध्ये कोंडवाड्याचेच बांधकाम करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाने दिले.प्रशासनाने दिलेल्या या लेखी पत्रावर ग्रामपंचायत अधिकारी व प्रशासक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. “शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जनावरांच्या सोयीसाठी हा लढा होता. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे मी माझे आत्मदहन आंदोलन स्थगित करत आहे,” अशी प्रतिक्रिया प्रकाश जेउघाले यांनी दिली आहे.या निर्णयामुळे वरवंड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, हा लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याचा विजय मानला जात आहे.
“हा लढा केवळ माझा नसून संपूर्ण वरवंडच्या शेतकऱ्यांचा आणि मुक्या प्राण्यांच्या हक्काचा होता. प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलत लेखी आश्वासन दिल्याने मी आंदोलन मागे घेत आहे.” > — प्रकाश जेउघाले, आंदोलनकर्ते शेतकरी
