बुलढाणा पोलिसांची धडाकेबाज कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून ५ दरोडेखोरांना ठोकल्या बेड्या…
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):बनावट रत्ने विकण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा बुलढाणा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि अंधेरा पोलिसांनी जालना जिल्ह्याच्या हद्दीवर ३ किलोमीटरपर्यंत सिनेस्टाईल पाठलाग करून ५ अट्टल दरोडेखोरांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की नांदेड येथील फिर्यादी चंद्रशेखर गुंडय्या स्वामी यांना आरोपींनी ‘रत्न आणि सुलेमानी हकीक’ विक्री करायचे असल्याचे सांगून चिखली येथील राजवाडा परिसरात बोलावले होते. फिर्यादी तिथे पोहोचले असता, आरोपी निलेश नरेश भोसले, जॅकीचंद पवार, आदित्य भोसले, राज पवार आणि भाऊराजा पवार यांनी त्यांना लाकडी काठीने मारहाण केली. यावेळी आरोपींनी फिर्यादीजवळील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ४ लाख ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला.घटनेची माहिती मिळताच अंधेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी तातडीने तपासाचे आदेश दिले. आरोपी जालना जिल्ह्याकडे पळून गेल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपींनी शेतातून पळ काढला, मात्र पोलिसांनी ३ कि.मी. धावत जाऊन त्यांना पकडले.पोलिसांनी आरोपींकडून चोरीला गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात: सोन्याच्या अंगठ्या आणि कुंडल (किंमत ३.५० लाख) चांदीचे कडे, ब्रेसलेट, चेन आणि बेड्या (किंमत १.१८ लाख) रोख ११,००० रुपये आणि अष्टधातूची गदा.ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, सपोनि रुपेश शक्करगे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे.
