चिखली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : लाभार्थ्यांना धनादेश व दाखल्यांचे वितरण

0
FB_IMG_1778586131572

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ) : चिखली तालुक्यातील नागरी क्षेत्रासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महसूल विभाग चिखली व नगर परिषद चिखली यांच्या संयुक्त विद्यमाने संत सावता माळी भवन, चिखली येथे हे शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या शिबिरात ग्रामस्थ व शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष पंडितराव देशमुख हे होते, तर उद्घाटक म्हणून अंकुशराव पाटील उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांमध्ये उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर, तहसीलदार विजय सवडे, मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर, भूमी अभिलेख विभागाचे श्री. रेड्डी, मंडळ अधिकारी भगवान पवार तसेच नगर परिषद चिखलीचे सभापती व नगरसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व राज्यगीताने करण्यात आली. तहसीलदार विजय सवडे यांनी प्रस्तावनेत नवीन अकृषक नियम, शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमितीकरण, शासन निर्णय दि. 25 मार्च 2026, पाणंद रस्ते व तुकडेबंदी कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली.मार्गदर्शन करताना अंकुशराव पाटील यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी “शासन आपल्या दारी” उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते महसूल विभागाशी संबंधित जिवंत सातबारा, फेरफार, 8-अ उतारे, विविध दाखले, रमाई आवास योजनेचे धनादेश, जन्म-मृत्यू दाखले व मालमत्ता पत्रकांचे वाटप करण्यात आले. तसेच मातोश्री शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत 32 रस्त्यांच्या 2 किलोमीटर अंतराच्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.शिबिरामध्ये रमाई आवास योजनेअंतर्गत 15 धनादेश वितरित करण्यात आले. नगर परिषद मालमत्ता पत्रक 22, जिवंत सातबारा 43, फेरफार व 8-अ चे 210 उतारे, संजय गांधी व श्रावणबाळ योजनेंतर्गत 60 लाभार्थ्यांची प्रकरणे मंजूर करण्यात आली. तसेच 110 नागरिकांना उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. 52 लाभार्थ्यांचे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट तयार करण्यात आले. अनेक नागरिकांच्या प्रलंबित अडचणींचे तत्काळ निवारण झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी प्रभाकर गवळी यांनी, तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी प्रशांत बिडगर यांनी मानले. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी महसूल विभाग व नगर परिषद चिखलीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण शिबिर शिस्तबद्ध व यशस्वी वातावरणात पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!