कलमवीराला’ मिळाली शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी! पत्रकार भगवान साळवे यांची तालुकास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीवर वर्णी तातडीने मदत, विलंबाला चाप!’ शासनाचा नवा अध्यादेश; साळवेंनी श्रेय दिले आ. मनोज कायंदे व नितीन कायंदेंना…
सिंदखेडराजा ( अनिल दराडे ) शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या लेखणीतून मांडणाऱ्या ‘कलमवीराला’ आता थेट मदतीचा ‘शिलेदार’ बनवण्यात आले आहे! आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी व सरकारी फेऱ्यांत त्यांची हेळसांड थांबावी, यासाठी शासनाने गठीत केलेल्या तालुकास्तरीय शेतकरी आत्महत्या समितीवर ज्येष्ठ पत्रकार भगवान साळवे यांची सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीने सिंदखेडराजा तालुक्यात समाधानाचे वातावरण आहे.महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करत तालुकास्तरीय समित्याही नव्याने गठीत केल्या आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जायची, मात्र आता नियमित अर्थसंकल्पातून निधी देऊन प्रक्रियेतील दिरंगाई संपवण्याचा चंग शासनाने बांधला आहे. अभ्यास समितीच्या शिफारशीनुसार समितीची रचनाच बदलण्यात आली आहे.या तालुकास्तरीय समितीचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी असतील, तर तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहतील. याशिवाय गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, अग्रणी बँक प्रतिनिधी, पशुसंवर्धन अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थेचा प्रतिनिधी यांचा समावेश आहे. या ‘मदत-सेनेत’ पत्रकार भगवान साळवे यांना स्थान मिळाले आहे.आपल्या निवडीबद्दल बोलताना पत्रकार भगवान साळवे म्हणाले, “शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून पाहिले आहेत. त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन. या नियुक्तीचे श्रेय मी आमदार मनोज कायंदेव बळीवंश चे नितीन कायंदे यांना देतोशेतकरी आत्महत्येसारख्या दुर्दैवी घटनेनंतर कुटुंबाला आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा आणि विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून देण्याची महत्त्वाची जबाबदारी आता या समितीवर असणार आहे. पत्रकार साळवे यांच्या अनुभवाचा फायदा शेतकरी कुटुंबांना नक्कीच होईल, असा विश्वास तालुक्यातील शेतकरी व सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
