हुमणी अळी नियंत्रणासाठी कृषी विभागाची अंबाशी येथे जनजागृती मोहीम; खरीप नियोजनाबाबत मार्गदर्शन….
चिखली/अंबाशी (एकनाथ माळेकर):खरीप हंगाम तोंडावर असताना पिकांवरील हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. तालुका कृषी अधिकारी श्री. सुरडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाशी येथे ‘खरीप हंगामपूर्व नियोजन सभा’ पार पडली. यावेळी हुमणी अळीचे नियंत्रण, सोयाबीन बियाणे चाचणी आणि आधुनिक पेरणी पद्धतींबाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.हुमणी अळी ही पिकांचे मोठे नुकसान करते, त्यामुळे पहिल्या पावसानंतर सर्व शेतकऱ्यांनी सामूहिकरीत्या ‘लाईट ट्रॅप’ (प्रकाश सापळे) लावावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच बांधावरील बोर, कडुलिंब व बाभळीच्या फांद्यांची छाटणी केल्यास हुमणीच्या भुंगेऱ्यांचा नायनाट करणे सोपे जाते. नियंत्रणासाठी रासायनिक खतात कार्टाप हायड्रोक्लोराईड किंवा फिप्रोनील मिसळावे. तसेच ‘मॅटॅरिझियम ॲनिसोप्ली’ या जैविक बुरशीचा वापर ५० किलो कुजलेल्या शेणखतात ३ किलो या प्रमाणात करून पेरणीपूर्वी जमिनीत मिसळण्याचा सल्ला दिलासोयाबीनची पेरणी करताना शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन करत खालील प्रमुख मुद्द्यांवर भर दिला: घरी साठवलेल्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्क्यांहून अधिक असेल तरच बीजप्रक्रिया करून पेरणी करावी. किमान १०० मि.मी. पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. उत्पादन वाढीसाठी बीबीएफ (BBF) पद्धत, पट्टा पद्धत किंवा बेडवर लागवड या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा.शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या ‘महाविस्तार ए आय’ या ॲपबद्दलही यावेळी सविस्तर माहिती देण्यात आली. हे ॲप शेतकऱ्यांसाठी डिजिटल मित्र म्हणून काम करणार असून, त्याद्वारे तांत्रिक माहिती मिळवणे सुलभ होणार आहे.या नियोजन सभेला मार्गदर्शक म्हणून उपकृषी अधिकारी श्री. आर. ए. परिहार साहेब, श्री. बी. एस. पाटील साहेब आणि श्री. डी. एन. दंदाले साहेब उपस्थित होते. सभेला अंबाशीचे सरपंच, ग्रामपंचायत प्रतिनिधी आणि बहुसंख्य शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.
