लोणार तालुक्यात धोकादायक रेती वाहतूक सुरूच, दुचाकी धारक त्रस्त;डोळ्यात रेती आणि पाणी, पण लोक प्रतिनिधी यांची चुप्पी का?
लोणार (यासीन शेख):लोणार शहर व तालुक्यातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यांवरून सध्या विना झाकून (ताडपत्री न लावता) रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा सुळसुळाट झाला आहे. कोणतीही सुरक्षा नियमावली न पाळता भरधाव वेगाने जाणाऱ्या या हायवा आणि टिप्परमुळे महामार्गांवर मोठ्या प्रमाणावर रेती सांडत असून, मागून येत असलेल्या दुचाकी चालकांच्या डोळ्यात रेतीचे कण आणि त्यातून निघणारे पाणी जात असल्याने अपघाताचा धोका कमालीचा वाढला आहे. एकीकडे सामान्य जनता आणि पर्यटक या त्रासाने होरपळत असताना, विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात मात्र या गंभीर समस्येवर पूर्णपणे चूप असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांत तालुक्यात अवैध व नियमबाह्य रेती वाहतुकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अनेक वाहनचालक महसूल आणि आरटीओ (RTO) विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवून उघड्यावरच रेतीची वाहतूक करत आहेत. भरधाव वाहनांमधून उडणारी रेती थेट पाठीमागून येणाऱ्या वाहनचालकांच्या डोळ्यात शिरते. यामुळे दुचाकी चालकांचे नियंत्रण सुटून लहान-मोठे अपघात घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. तसेच, रस्त्यावर सांडणाऱ्या रेतीमुळे वाहने घसरण्याचे प्रमाणही वाढले आहे.
सरोवराच्या रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य
जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या काठावरून आणि तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गांवर रेती सांडत असल्याने परिसरात कमालीची धूळ निर्माण झाली आहे. या उघड्या वाहतुकीमुळे रस्त्यांवर प्रचंड धुळीचे साम्राज्य पसरले असून, रस्ते कडेला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचा आणि पर्यटकांचा श्वसनाचा त्रास कमालीचा बळावला आहे. पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या सरोवर परिसरात यामुळे प्रदूषणात मोठी भर पडत आहे.
रात्री आणि पहाटे वाहतुकीचा धुमाकूळ; आमदार खरात कधी बोलणार?
प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी बहुतांश रेती वाहतूकदार मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास सक्रिय असतात. या वेळेत वाहनांचा वेग अनियंत्रित असतो. विशेष म्हणजे, कारवाईची भीती नसल्यासारखी अनेक वाहने विना नंबर प्लेट धावत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे. तालुक्यात एवढा मोठा उच्छाद सुरू असताना आणि दररोज जनतेचा जीव टांगणीला लागलेला असताना, आमदार सिद्धार्थ खरात यांनी अद्याप यावर अवाक्षरही न काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधींचा या वाहतूकदारांना मूक पाठिंबा आहे का? असा रोकडा सवाल आता जनता विचारत आहे.
प्रशासनाच्या सुस्त भूमिकेवर तीव्र संताप
नियमबाह्य आणि धोकादायक पद्धतीने होणाऱ्या या वाहतुकीकडे स्थानिक महसूल प्रशासन आणि परिवहन विभाग सोयीस्कर ,”अर्थपूर्ण दुर्लक्ष “करत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. अपघातांचे सत्र थांबवण्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने जागे होऊन विना ताडपत्री धावणाऱ्या अशा बेजबाबदार वाहनांवर जप्तीची व दंडात्मक कडक कारवाई करावी, अशी मागणी लोणार तालुक्यातील ग्रामस्थांनी व पर्यटकांनी केली आहे.
