बुलढाणा पोलिसांच्या सतर्कतेने बालविवाह रोखला; ‘डायल ११२’ ठरली देवदूत!१४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात यश; चाईल्ड हेल्पलाईन आणि पोलिसांची संयुक्त कारवाई…
बुलढाणा ( बुलढाणा माझा वृत्तसेवा ):एकीकडे प्रशासनाकडून बालविवाह रोखण्यासाठी व्यापक जनजागृती केली जात असतानाच, बुलढाणा शहरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र, ‘डायल ११२’ वर मिळालेल्या एका माहितीमुळे आणि बुलढाणा शहर पोलिसांच्या तत्परतेमुळे हा विवाह रोखण्यात यश आले असून एका अल्पवयीन मुलीचे भविष्य सुरक्षित झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १४ मे) रात्री साडे नऊच्या सुमारास बुलढाणा शहर पोलिसांना ‘डायल ११२’ या आपत्कालीन क्रमांकावर एक निनावी कॉल प्राप्त झाला. खामगाव रोडवरील संतनगरी (माळविहीर शिवार)परिसरात एका १४ वर्षीय मुलीचा विवाह शुक्रवारी (दि. १५ मे) होणार असल्याचे या कॉलद्वारे सांगण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या.याच दरम्यान जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयांतर्गत असलेल्या ‘चाईल्ड हेल्पलाईन’ने देखील या विवाहाबाबत पोलिसांकडे मदतीची मागणी केली होती. ठाणेदार संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चाईल्ड हेल्पलाईनच्या पथकासह रात्रीच संतनगरी परिसर गाठला. तिथे प्रत्यक्ष चौकशी केली असता मुलगी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ हा विवाह रोखून संबंधितांना कायद्याचा बडगा दाखवत पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संग्राम पाटील, सपोनि. युवराज रबडे, महिला पोलीस कॉन्स्टेबल अनिता आराख, पोलीस नाईक सतिष पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल विकास सुरडकर यांच्या पथकाने केली. बालविवाह हा कायद्याने गुन्हा असून, समाजात कुठेही असा प्रकार घडत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी तातडीने ‘डायल ११२’ किंवा चाईल्ड हेल्पलाईनशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
