Screenshot_2026-05-15-12-55-15-86_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

सिंदखेड राजा( बुलढाणा माझा वृत्तसेवा)लग्नमंडपात सनई-चौघड्यांचे सूर घुमत होते, नातेवाईकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वहात होता. लेकीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असलेल्या ‘कन्यादान’ विधीची तयारी सुरू झाली. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. मुलीचा हात जावयाच्या हातात देण्यापूर्वीच वधूपित्याला काळाने झडप घातली. कन्यादान विधी सुरू असतानाच वधूपित्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मंडपातच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी बुद्रुक येथे घडली आहे.वर्दडी बुद्रुक येथील रहिवासी आणि एक सामान्य शेतकरी असलेले कुरूमदास भुतेकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा काल रात्री अत्यंत उत्साहात सुरू होता. विवाह विधी अंतिम टप्प्यात आले असताना कन्यादानाचा क्षण आला. कुरूमदास भुतेकर हे आपल्या लाडक्या लेकीचे कन्यादान करण्यासाठी पुढे सरसावले. याच दरम्यान त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना सुरू झाल्या आणि ते मंडपातच कोसळले.​मंडपातील नातेवाईकांनी आणि उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला, मात्र दुर्दैवाने वैद्यकीय मदत मिळण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. प्राथमिक माहितीनुसार, हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.​ज्या लेकीला सुखाचा संसार थाटण्यासाठी पाठवणी करायची होती, त्याच लेकीसमोर वडिलांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नववधूसह संपूर्ण कुटुंबाचा आक्रोश काळजाला घर पाडणारा होता. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गाव आणि नातेवाईक स्तब्ध झाले.एका सामान्य आणि कष्टाळू शेतकरी पित्याचा असा लग्नाच्या मांडवातच अचानक मृत्यू झाल्याने वर्दडी बुद्रुक परिसरासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!