इंदिरानगरात गांजाचे कोठार! चिखली पोलिसांची धडक कारवाई, ९ किलो गांजासह एक गजाआड ४.६० लाखांचा माल जप्त! LCB च्या टीमने उधळला ‘नशे’चा बाजार; सय्यद समीरला बेड्या…

0
IMG-20260517-WA0002

बुलढाणा ( प्रतिनिधी अनिल दराडे ) “नशेच्या व्यापारांना बुलढाणा जिल्ह्यात कुठलाही थारा दिला जाणार नाही!” हा स्पष्ट आणि सज्जड संदेश देत स्थानिक गुन्हे शाखा (LCB), बुलढाणा च्या पथकाने चिखली शहरात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शहरातल्या इंदिरानगर भागात चक्क स्वतःच्या घरातच गांजाचे ‘गोदाम’ थाटून बसलेल्या एका तस्कराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या गोपनीय छाप्यात पोलिसांनी तब्बल ९ किलो २१५ ग्रॅम गांजा जप्त केला असून, बाजारपेठेतील त्याची एकूण किंमत ४ लाख ६० हजार ७५० रुपये एवढी आहे.मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, चिखली शहरातल्या निवासी भागात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. शनिवार, दि. १६ मे रोजी मिळालेल्या या गोपनीय माहितीच्या आधारे LCB च्या पथकाने इंदिरानगर, चिखली येथील संशयित घरावर अचानक आणि अचूक छापा टाकला.या झडतीत आरोपी सय्यद समीर सय्यद सलीम (रा. चिखली) हा घरातूनच अमली पदार्थांचे जाळे चालवत असल्याचे आणि गांजाची अवैध विक्री करत असल्याचे रंगेहात निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने त्याला बेड्या ठोकून संपूर्ण माल जप्त केला.या धडक कारवाईनंतर चिखली पोलीस ठाण्यात आरोपी सय्यद समीर विरुद्ध अप. क्र. /२०२६ कलम ८ (c), २०(B)(ii)(2) NDPS Act (अमली पदार्थ विरोधी कायदा) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीला पुढील कायदेशीर न्यायालयीन कोठडी आणि सखोल तपासासाठी चिखली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या गुन्ह्यामागे आणखी कोणाचे हात आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) श्री. अमोल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्री. श्रेणिक लोढा व उपविभागीय पोलीस अधिकारी (बुलढाणा) सुधीर पाटील यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांनी या संपूर्ण छाप्याचे अचूक नियोजन व नेतृत्व केले.सहा. पोलीस निरीक्षक (API) यशोदा कणसे, हेड कॉन्स्टेबल (HC) दीपक लेकुरवाळे, अनुपकुमार मेहेर, विजय वारुळे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल (NPC) अरविंद बडगे, रवी भिसे पोलीस कॉन्स्टेबल (PC)अमोल वनारे, मंगेश सनगाळे, सतीश नाटेकर, दीपक वायाळ,चालक HC समाधान टेकाळे व स्थानिक गुन्हे शाखेचे इतर अंमलदार. चिखलीसारख्या गजबजलेल्या शहरात आणि तेही निवासी भागात सुरू असलेल्या या मोठ्या नशाबाजाचा पर्दाफाश झाल्याने स्थानिक नागरिकांनी सुटकेचा श्वास टाकला असून पोलिसांचे जोरदार कौतुक केले आहे. ‘नशामुक्त बुलढाणा’ मोहिमेसाठी पोलिसांचा हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ यापुढेही अधिक तीव्रतेने सुरूच राहील, असा सज्जड इशारा वरिष्ठ पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील अवैध धंदेवाल्यांना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!