खरीप पूर्वमशागत संकट : ट्रॅक्टरला कॅनमध्ये डिझेल नाकारल्यास २५ मे रोजी ‘रास्ता रोको’युवा सेना व सरपंचांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चिखली-जालना हायवेवर आंदोलनाचा इशारा…

0
1779254951257

बुलढाणा (एकनाथ माळेकर): जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून डिझेल व पेट्रोलची तीव्र टंचाई जाणवत असतानाच, आता ऐन पेरणीच्या तोंडावर पेट्रोल पंप चालकांनी ट्रॅक्टरधारकांना कॅनमध्ये (डब्यांमध्ये) डिझेल देण्यास नकार दिला आहे. प्रशासनाच्या कथित आदेशाचा हवाला देत शेतकऱ्यांना डिझेल नाकारले जात असल्याने जिल्ह्यातील खरीप पूर्वमशागतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. या अन्यायाविरोधात युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील भुतेकर आणि मंडपगावचे सरपंच सचिनभाऊ कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन २५ मे रोजी तीव्र ‘रास्ता रोको’ आंदोलनाचा इशारा दिला आहे. सध्या पावसाळा अगदी तोंडावर आला असून शेतातील नांगरणी, वखरणी आणि पेरणीची कामे सुरू झाली आहेत. आजच्या काळात ट्रॅक्टरशिवाय शेतीची मशागत करणे अशक्य आहे. मात्र, चिखली आणि देऊळगाव राजा तालुक्यांतील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा आहे, आणि जिथे उपलब्ध आहे तिथे ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल भरून दिले जात नाही. डिझेलअभावी शेकडो ट्रॅक्टर जागेवरच उभे असून हजारो हेक्टरवरील शेतीची मशागत बाकी आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.प्रशासनाचा जाचक नियम; पंपांना दंडाचा फटका डिझेल आणण्यासाठी प्रत्येक वेळी अख्खा ट्रॅक्टर घेऊन पंपावर येणे आणि तिथे तासनतास रांगेत उभे राहणे शेतकऱ्यांना व ट्रॅक्टर मालकांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यातच ज्या पेट्रोल पंप चालकांनी शेतकऱ्यांची अडचण ओळखून त्यांना कॅनमध्ये डिझेल दिले, अशा पंप चालकांना प्रशासनाने दंड ठोठावला असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. प्रशासनाची ही पद्धत अत्यंत चुकीची व शेतकरीविरोधी असून, यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. वेळेत डिझेल उपलब्ध झाले नाही, तर हजारो हेक्टर शेती पेरणीविना पडीक राहण्याची भीती निर्माण झाली आहे.सोमवारी चिखली-जालना हायवे रोखणार या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित सर्व पेट्रोल पंपांना आदेश देऊन ट्रॅक्टर मालकांना कॅनमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे आणि शेतकऱ्यांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर तत्काळ तोडगा न काढल्यास येत्या सोमवारी (दि. २५ मे) असंख्य ट्रॅक्टरसह चिखली-जालना हायवेवर अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संतोष पाटील भुतेकर व सचिनभाऊ कदम यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!