अंत्रीकोळीत रायपूर पोलिसांचा छापा: आंतरजिल्हा टोळी जेरबंद​२ पिस्तूल, ९४ काडतुसांसह ७ लाखांचा मुद्देमाल जप्त; दहशतवाद विरोधी पथक अन् रायपूर पोलिसांची संयुक्त कारवाई…

0
Screenshot_2026-05-19-20-55-43-76_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

चिखली (चंद्रशेखर काळे)तालुक्यातील अंत्रीकोळी येथे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा रायपूर पोलीस आणि अकोला दहशतवाद विरोधी पथकाने (ATF) संयुक्त कारवाई करत पर्दाफाश केला. या छाप्यात पोलिसांनी तीन आरोपींना रंगेहात अटक केली असून, त्यांच्याकडून २ देशी बनावटीच्या पिस्तूल, ९४ काडतुसे आणि एका लक्झरी कारसह एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील ग्राम अंत्रीकोळी येथे काही इसम बेकायदेशीर घातक शस्त्रास्त्रांसह थांबले असल्याची गोपनीय माहिती रायपूर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रायपूर पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने १८ मे रोजी अंत्रीकोळी येथे पंचांसमक्ष भारतीय शस्त्र अधिनियमाप्रमाणे धाड टाकली.या कारवाईदरम्यान पोलिसांनी घेराव घालून तीन सराईत आरोपींना ताब्यात घेतले. यामध्ये शुभम सागर पवार (वय वर्षे, रा. कारला चौक, वर्धा), रुपेश मिलन शिंदे (रा. हसानाबाद, ता. भोकरदन, जि. जालना, सध्या रा. पाचोरा, जि. जळगाव) आणि रोहेल मिलन शिंदे (रा. हसानाबाद, ता. भोकरदन, जि. जालना, सध्या रा. पाचोरा, जि. जळगाव) यांचा समावेश आहे. हे आरोपी वेगवेगळ्या जिल्ह्यांतील असून ते अंत्रीकोळी भागात कशासाठी आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत. आरोपींची अंगझडती आणि वाहनाची तपासणी केली असता, पोलिसांना मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा मिळून आला. यामध्ये २ देशी बनावटीच्या पिस्टल, ४ मॅगझीन, ९२ जिवंत काडतुसे, २ वापरलेली काडतुसे, १ लोखंडी चाकू, महिंद्रा XUV500 कार (क्र. MH 20 DJ 8687) आणि आयफोन १६ प्रो मॅक्स मोबाईल असा एकूण ७ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अनंत कळमकर यांच्या फिर्यादीवरून रायपूर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध अप.क्र. ९२/२०२६, कलम ३, ५, ७, २५ भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम १३५(३) महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची यशस्वी कारवाई रायपूरचे ठाणेदार निलेश सोळंके, पोहेका दशरथ शितोळे, पोहेका ज्योती गलबले, पोका राहुल जाधव, अनंत कळमकर, अख्तर शेख, लक्ष्मण शिंदे, चालक सागर कोरडे तसेच दहशतवाद विरोधी पथक, अकोला यांनी संयुक्तपणे पार पाडली. पुढील तपास ठाणेदार निलेश सोळंके व पोका लक्ष्मण शिंदे करत आहेत.

जिल्ह्यात शस्त्र तस्करीचे मोठे रॅकेट?

अटक करण्यात आलेले आरोपी वर्धा, जालना आणि जळगाव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर जिवंत काडतुसे आणि पिस्तूल आरोपींकडे कोठून आले? त्यांचा हेतू काय होता? आणि या आंतरजिल्हा टोळीचे धागेदोरे आणखी कुठे पसरले आहेत, यादृष्टीने आता पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!