काम कागदावरच पूर्ण, प्रत्यक्षात गाव तहानलेले!कंडारी येथे ‘जलजीवन’चा बोगस कारभार चव्हाट्यावर; २० मेपासून ग्रामस्थांचे आमरण उपोषण कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाईची मागणी जिल्हाधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्र्यांना निवेदने; प्रशासकीय गोटात खळबळ…
सिंदखेड राजा ( अनिल दराडे)केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेचा सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदूर्जन जवळील कंडारी येथे पुरता बोगस कारभार चव्हाट्यावर आला आहे. गावात पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्याचे भासवून कागदोपत्री केवळ देखावा करण्यात आला आहे; मात्र प्रत्यक्षात आजपर्यंत गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही. प्रशासनाच्या या उदासीन आणि दिशाभूल करणाऱ्या कारभाराविरोधात कंडारी येथील ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून, येत्या २० मे २०२६पासून गावातील मारोती मंदिराजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.तक्रारी केराच्या टोपलीत!कंडारी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. मात्र, प्रत्यक्षात गावातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र हाल सोसत आहेत. हा प्रश्न नागरिकांच्या मूलभूत अधिकारांशी निगडित असल्याने ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा तोंडी व लेखी तक्रारी, निवेदने संबंधित विभागाला सादर केली. थेट अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांची भेट घेऊनही गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी कोणतीही गंभीर दखल घेण्यात आली नाही. प्रत्येक वेळी केवळ उडवाउडवीची उत्तरे देऊन प्रशासनाने ग्रामस्थांची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे.तर प्रशासन जबाबदार; आरपारची लढाई!वारंवार विनंती करूनही पाणी पुरवठा सुरू न झाल्याने अखेर संतप्त कंडारीवासीयांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. जर जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा तात्काळ सुरू झाला नाही, तर २० मे पासून शिवाजी सुदामा खरात यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ आमरण उपोषणाला बसणार आहेत. या दरम्यान होणाऱ्या कोणत्याही अनुचित प्रकाराला आणि कायदा-सुव्यवस्थेच्या परिस्थितीला पूर्णपणे प्रशासनच जबाबदार राहील, असा थेट इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.मुख्य मागण्या: या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात यावी.गावात तात्काळ आणि नियमित पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा.या आंदोलनात शिवाजी सुदामा खरात यांच्यासह विद्याधर हिंमतराव घुगे, संतोष शिवाजी जायभाये, स्वप्नील शिवाजी कायंदे, प्रद्युम्न मनोहर कायंदे, रमेश माहादु कायंदे, मदन विष्णुपंत कायंदे, आत्माराम देवराव घुगे, अशोक अर्जुन नागरे व अरुण विश्वनाथ कायंदे हे ग्रामस्थ उपोषणाला बसणार आहेत.
