रायपूर येथील भारत गॅस एजन्सीच्या सिलेंडरच्या काळाबाजाराचा आरोप; शिवसेनेकडून तहसीलदारांना निवेदन…
चिखली( एकनाथ माळेकर)शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा काळाबाजार होत असल्याचा गंभीर आरोप करत शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. शिवसेना उपशहर प्रमुख राहुल रामदास वरवंडे यांनी शहर प्रमुख श्रीराम झोरे यांच्या मार्गदर्शनात निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, रायपूर येथील भारत गॅस एजन्सीच्या काही सिलेंडरचा साठा चिखली शहरातील सैलानी नगर परिसरात करण्यात येत असून, काही नागरिकांकडून अधिक पैशांत गॅस सिलेंडर विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केला जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांकडून १००० ते १५०० रुपयांपर्यंत रक्कम घेऊन गॅस सिलेंडर दिले जात असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. सामान्य ग्राहकांनाही निश्चित किमतीपेक्षा २०० ते ३०० रुपये अधिक आकारले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.या प्रकारामुळे परिसरात अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सात दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही शिवसेनेकडून देण्यात आला आहे.या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, तहसीलदार, जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलीस स्टेशन यांना देण्यात आल्या आहेत.निवेदनावर मनोहर जाधव, पुंजाजी शेळके, समाधान जाधव, अक्षय झोरे,शेख अफसर, दिपक जाधव, संतोष देशमुख, दिलीप कापसे, प्रल्हाद वाघ रवी पेठकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
