चिखली-जाफ्राबाद रस्त्याच्या कामात अडीच कोटींचा घोळ? ‘शिवसेना विद्यार्थी सेने’चा १ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा निकृष्ट काम असतानाही PWD कडून कंत्राटदाराला बिल अदा केल्याचा आरोप….

0
IMG-20260521-WA0036

चिखली ( बुलढाणा माझा न्यूज ):चिखली शहरातील अत्यंत गजबजलेला आणि महत्त्वाचा मानला जाणारा चिखली ते जाफ्राबाद मार्ग (डॉ. काळुसे हॉस्पिटल ते आमराई) सध्या कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) अक्षम्य दुर्लक्षामुळे नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावरील २.५० कोटी रुपयांच्या ‘व्हाईट टॉपिंग’ रस्त्याच्या कामात प्रचंड अनियमितता झाली असून, चिखलीकरांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. या भ्रष्टाचाराविरोधात आणि रखडलेले काम तात्काळ पूर्ण करावे या मागणीसाठी १ जून २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘शांततापूर्ण लक्षवेधी आंदोलन’ करण्यात येणार असल्याचा इशारा शिवसेना विद्यार्थी सेनेचे चिखली तालुका प्रमुख ओमराजे मदनराजे गायकवाड यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी व PWD च्या मुख्य अभियंत्यांना अधिकृत निवेदन सादर केले आहे.जुन्या डांबरी रस्त्याला पाया मानून त्यावर सिमेंट काँक्रीटचा विशिष्ट जाडीचा थर चढवणे (White Topping) या तंत्रज्ञानाचा वापर केवळ कागदावरच राहिल्याचे दिसत आहे. प्रत्यक्ष जमिनीवर कंत्राटदाराने एका बाजूचे जुजबी काम केले असून, कामाचा दर्जा अत्यंत सुमार आणि निकृष्ट आहे. असे असतानाही सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदाराला २.५० कोटी रुपयांचे देयक (बिल) नेमके कसे अदा केले? असा गंभीर प्रश्न निवेदनातून उपस्थित करण्यात आला आहे. धुळीचे साम्राज्य आणि अपघातांची मालिकाअत्यंत मंद गतीने चालणाऱ्या या कामामुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचे भयानक लोट उठत आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालकांना समोरील वाहन देखील दिसत नाही. परिसरात श्वसनाचे विकार आणि डोळ्यांचे आजार वाढले असून अनेक छोटे-मोठे अपघात होऊन नागरिक जखमी होत आहेत. नियमानुसार रस्त्यावर नियमित पाणी मारणे आवश्यक असताना कंत्राटदाराकडून कोणतीही उपाययोजना केली जात नाही.माहिती अधिकार (RTI) अंतर्गत माहिती दडपलीया कामातील गैरव्यवहार आणि प्रशासकीय नाकर्तेपणा समोर येऊ नये म्हणून माहिती अधिकारांतर्गत (RTI) मागितलेली माहिती जाणीवपूर्वक दडपून ठेवली जात आहे, तसेच माहिती मागणाऱ्या अर्जदाराचा मानसिक छळ केला जात असल्याचा खळबळजनक आरोप ओमराजे गायकवाड यांनी केला आहे.पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण न झाल्यास चिखलीकर वेठीस! “डॉ. काळुसे हॉस्पिटल ते आमराई दरम्यानचे हे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पावसाळा आता उंबरठ्यावर असून जर त्यापूर्वी हा रस्ता पूर्ण झाला नाही, तर चिखलीकरांचे हाल आणि वाहतूक कोंडी अधिक भयानक होईल. काम अर्धवट असताना बिल अदा करण्याची घाई प्रशासनाने का केली? याचा जाब विचारण्यासाठी आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी आम्ही १ जून रोजी शांततापूर्ण आंदोलन करणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!