“हुमणी अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांनी वेळीच सतर्क होण्याची गरज”वझर आघाव येथे उद्या कृषी विज्ञान केंद्राचा विशेष मार्गदर्शन कार्यक्रमहुमणी अळी नियंत्रण, प्रतिबंधात्मक उपाययोजना व पीक संरक्षणाबाबत तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन…
रघुनाथ आघाव लोणार तालुका प्रतिनिधी
लोणार : खरीप हंगाम तोंडावर आलेला असताना हुमणी अळीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी वर्गात मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. मागील काही वर्षांपासून हुमणी अळीमुळे सोयाबीन, कापूस, मका, तूर, भुईमूग तसेच इतर नगदी व खाद्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून अनेक शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. पिकांच्या मुळांवर थेट आक्रमण करणारी ही अळी अत्यंत घातक मानली जात असून सुरुवातीच्या टप्प्यात तिचा प्रादुर्भाव ओळखणे कठीण जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.मागील वर्षी वझर आघावसह परिसरातील अनेक गावांमध्ये हुमणी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून आला होता. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिके अचानक पिवळी पडणे, वाढ खुंटणे, रोपे वाळणे अशा घटना घडल्या होत्या. काही ठिकाणी संपूर्ण शेतातील पिके नष्ट झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. वाढते बियाणे, खते, औषधे आणि मशागतीचा खर्च यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने आणखी संकट ओढवले होते.हुमणी अळी ही जमिनीखाली राहून पिकांच्या मुळांवर आक्रमण करते. त्यामुळे पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये मिळत नाहीत आणि पीक हळूहळू सुकू लागते. सुरुवातीला शेतकऱ्यांना पिकांवरील परिणाम सहज लक्षात येत नाही. मात्र काही दिवसांतच संपूर्ण शेतामध्ये नुकसान वाढत जाते. विशेषतः पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळात जमिनीतील आर्द्रता वाढल्यास हुमणी अळीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना योग्य वेळी मार्गदर्शन मिळावे, प्रतिबंधात्मक उपाययोजना समजाव्यात तसेच वैज्ञानिक पद्धतीने कीड नियंत्रण करता यावे यासाठी कृषी विभागाच्या पुढाकारातून उद्या दिनांक २२ मे २०२६ शुक्रवार रोजी वझर आघाव येथे “हुमणी अळी नियंत्रण” या विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमासाठी कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा येथील तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. झापे सर हे विशेष उपस्थित राहणार असून ते शेतकऱ्यांना हुमणी अळीची ओळख, जीवनचक्र, प्रादुर्भावाची कारणे, शेतातील सुरुवातीची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, योग्य औषधांचा वापर, बीजप्रक्रिया, सेंद्रिय व रासायनिक उपाय, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच वेळेवर करावयाचे नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन करणार आहेत.कृषी विभागाच्या माहितीनुसार, हुमणी अळीवर वेळेत नियंत्रण मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमित शेत पाहणी करणे, पेरणीपूर्व योग्य नियोजन करणे, शिफारशीनुसार औषधांचा वापर करणे तसेच कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. वेळेत नियंत्रण न मिळाल्यास अल्पावधीत मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते, असा इशाराही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.सदर मार्गदर्शन कार्यक्रम सकाळी ठीक १० वाजता हनुमान मंदिर, वझर आघाव येथे आयोजित करण्यात आला असून परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी रविराज शिदोरे तसेच कृषिसहाय्यक दिपाली पालवे यांनी केले आहे.“हुमणी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेळेवर उपाययोजना आणि योग्य नियोजन करणे हीच खरी पीक संरक्षणाची गुरुकिल्ली आहे. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन सतर्क राहिल्यास मोठे नुकसान टाळता येऊ शकते,” असे मत कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.
