सिनेस्टाईल पाठलाग करून ५ दरोडेखोरांना जालना हद्दीवर आवळल्या मुसक्या; ४ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त अंढेरा पोलिसांची धडक कारवाई; आरोपींकडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड हस्तगत…
बुलढाणा ( एकनाथ माळेकर): चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील राजाभाऊ सिमेंट खिडकी येथे फिर्यादीला लाकडी काठीने जबर मारहाण करून दागिने आणि रोकड जबरीने चोरून नेणाऱ्या ५ दरोडेखोरांना अंढेरा पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करत जालना जिल्ह्याच्या हद्दीवरून अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ४,८०,०००/- रुपये किमतीचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रशेखर गुंडप्पा स्वामी (वय ३२, रा. शंकरनगर, वसरणी, जि. नांदेड) यांना आरोपींनी चिखली येथे काही बिडीओ (BDO) विक्री करायची असल्याचे सांगून राजवाडा परिसरामध्ये बोलावून घेतले होते. त्यानंतर फिर्यादी हे चिखली येथे आले असता, आरोपींनी चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील राजाभाऊ सिमेंट खिडकी येथे त्यांना गाठले. तेथे फिर्यादीला लाकडी काठीने जबर मारहाण करून त्यांच्याजवळील सोन्या-चांदीचे दागिने, अष्टधातूची गदा आणि नगदी २० हजार रुपये असा एकूण ४,८९,०००/- रुपयांचा माल जबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी अंधेरा पोलीस ठाण्यात अपराध क्र. १६३/२०२६ कलम ३िओ(१) भारतीय न्याय संहिता (BNS) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड आणि देऊळगाव राजाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि रुपेश शक्कारगे यांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अंधेरा पोलिसांच्या पथकाने दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यांना जालना जिल्ह्याच्या हद्दीवर शिताफीने आवळून अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१) निलेश नरेश भोसले (वय ३२ वर्षे, रा. साकेगाव, ता. चिखली, जि. बुलढाणा)
२) जॅकीचंद विरोधीभाई पवार (वय २२ वर्षे, रा. साकेगाव, ता. चिखली)
३) आदित्य रेणू भोसले (वय २४ वर्षे, रा. साकेगाव, ता. चिखली)
४) राज अभिदान पवार (वय २३ वर्षे, रा. साकेगाव, ता. चिखली)
५) भाऊराजा शावनदार पवार (वय ४५ वर्षे, रा. कुंभारो फाटा, ता. जाफ्राबाद, जि. जालना)४ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त (तपशील):अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून खालीलप्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, न्यायालयाच्या आदेशान्वये हा संपूर्ण माल फिर्यादी चंद्रशेखर स्वामी यांना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक परत करण्यात आला आहे: सोन्याच्या अंगठ्या (०२ नग):२,८०,०००/- रुपये (प्रत्येकी ७ ग्रॅम) सोन्याचे कानकुंडल (०२ नग):७०,०००/- रुपये (५ ग्रॅम) चांदीचे कडे (४०० ग्रॅम):१,००,०००/- रुपये चांदीचे ब्रेसलेट (०२ तोळे):५,०००/- रुपये चांदीच्या पायातील बेड्या (४०० ग्रॅम): १०,०००/- रुपये अष्टधातूची गदा (१०० ग्रॅम):१,०००/- रुपये चांदीची अंगठी (५ ग्रॅम): १,०००/- रुपये चांदीची राखी व चैन: २,०००/- रुपये नगद रोख रक्कम: ११,०००/- रुपये एकूण जप्त मुद्देमाल: ४,८०,०००/- रुपयेसदरची धडक कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती मनिषा कदम यांच्या मार्गदर्शनात अंधेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सपोनि रुपेश शक्कारगे पोउपनि श्री दिनेश घूगे पोहेकॉ सिद्धार्थ सोनकांबळे, पोहेकॉ भारत पोफळे, पोकॉ किशोर जाधव, पोकॉ श्रीकांत पाखरे (सर्व नेमणूक पोलीस स्टेशन, अंधेरा) तसेच सायबर पोलीस स्टेशनचे राजू आडवे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या धडक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
