आयुष्यमान भारत कार्ड वितरणासाठी विशेष मोहीम,सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा – उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांचे आवाहन

0
IMG-20260527-WA0049

सिंदखेड राजा (अनिल दराडे) मा. जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार सिंदखेड राजा उपविभागामध्ये दिनांक २५ मे २०२६ पासून आरोग्य विभागामार्फत आयुष्यमान भारत कार्ड वितरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार असून, या कार्डधारकांना पॅनलवरील रुग्णालयांमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा मिळणार आहे.याबाबत उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सर्व नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांकडे आयुष्यमान भारत कार्ड असणे आवश्यक असून, नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षिततेसाठी तात्काळ हे कार्ड काढून घ्यावे.या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आज दिनांक २७ मे २०२६ रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी, ग्रामपातळीवरील ग्रामसेवक, CSC सेंटर धारक तसेच सेतू केंद्र चालक यांची ऑनलाईन पद्धतीने आढावा सभा घेण्यात आली. सभेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विशेष कॅम्प आयोजित करून आशा वर्कर यांच्या मदतीने जास्तीत जास्त नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या सूचना देण्यात आल्या.सभेमध्ये नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. CSC केंद्र चालकांना प्रत्येक कार्डमागे शासनाकडून २० रुपये कमिशन मिळणार असल्याने नागरिकांकडून कोणतीही फी आकारली जाणार नाही. आयुष्यमान भारत कार्ड पूर्णपणे मोफत असून, नागरिकांनी कार्ड काढण्यासाठी कोणालाही कोणत्याही प्रकारचे पैसे देऊ नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.यावेळी गटविकास अधिकारी अजित बांगर यांनी मार्गदर्शन करताना ग्रामसेवकांनी या मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्व नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व जास्तीत जास्त लाभार्थी तयार होतील यासाठी नियोजनबद्ध कार्य करावे, असे सांगितले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र साळवे यांनी आरोग्य विभागातील अधिकारी व आशा वर्कर यांनी गावपातळीवर सक्रिय सहभाग घेऊन पात्र नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असेही त्यांनी नमूद केले.या ऑनलाईन सभेला गटविकास अधिकारी अजित बांगर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र साळवे, सर्व मेडिकल ऑफिसर, सेतू केंद्र चालक, CSC केंद्र चालक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!