वीज चोरी पकडणाऱ्या पथकाला जबर मारहाण; दोन अधिकारी गंभीर जखमी!बिबी पोलिसात गुन्हा दाखल; आरोपीने कपाळावर मारली काठी.
बिबी (जयजीत आडे) :वीज चोरी पकडण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या मुंबई येथील विशेष भरारी पथकावर आणि स्थानिक कर्मचाऱ्यांवर एका वीज ग्राहकाने बांबूच्या काठीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना २६ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास किनगाव जट्टू येथे घडली. या हल्ल्यात महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ संजय खार्डे व सहाय्यक अभियंता समाधान पाटील हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या (मुंबई) मुख्य कार्यालयाचे विशेष पथक आणि बिबी कार्यालयाचे कर्मचारी मंगळवारी किनगाव जट्टू येथील बाजार गल्लीमध्ये वीज चोरी संदर्भात तपासणी करत होते. दुपारी १२ ते १ वाजेच्या दरम्यान येथील वीज ग्राहक अनिल भगवान नागरे यांच्या घराचे मीटर आणि केबल कनेक्शनला अवैध जॉइंट आहे का, याची खात्री पथक करत होते. याच वेळी आरोपी अनिल नागरे हातात बांबूची काठी घेऊन अचानक तिथे आला. त्याने काहीही न ऐकता पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करत थेट हल्ला चढवला.आरोपीने केलेल्या या अचानक हल्ल्यात बिबी येथील प्रधान तंत्रज्ञ संजय खार्डे यांच्या कपाळावर काठी लागल्याने कपाळ फुटून तीव्र रक्तस्त्राव सुरू झाला. तसेच त्यांच्या पाठीवर, हातावर आणि पायांवर काठीने सपासप वार करण्यात आले. त्यांना वाचवण्यासाठी गेलेले पथकातील अधिकारी सहाय्यक अभियंता समाधान दिनकर पाटील यांच्याही डाव्या खांद्यावर आणि हातावर काठीने जबर मारहाण करण्यात आली.हा प्रकार सुरू असताना पथकातील सदस्य ओम दिलीप आंधळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रण (व्हिडिओ) सुरू केले. इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेत खार्डे यांची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. मात्र, संतापलेल्या आरोपीने संजय खार्डे यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि “माझ्या घरचे मीटर चेक करायला का आले? तुम्हांला जिवानेच मारून टाकतो,”** अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल.हल्ल्याची भीषणता पाहून पथकातील सहाय्यक अभियंता अक्षय वंजारी यांनी तात्काळ डायल ११२ वर फोन करून पोलीस प्रशासनाकडे मदत मागितली. बिबी पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत जखमी कर्मचाऱ्यांना आरोपीच्या ताब्यातून सोडवले आणि उपचारासाठी बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुढील रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.या मोहिमेत महावितरणचे सहाय्यक अभियंता समाधान पाटील, चंद्रकांत पाटील, अक्षय वंजारी, अतुल बावस्कर, तंत्रज्ञ कोमल राठोड, विशाल वानखडे तसेच जीनस कंपनीचे गोरखनाथ चव्हाण, ओम जाधव आणि ओम आंधळे सहभागी झाले होते. याप्रकरणी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आरोपी अनिल भगवान नागरे याच्याविरुद्ध बिबी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रविराज चव्हाण पुढील तपास करत आहेत.
