मलकापुरात देहव्यापारावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; एजंटसह तिघांना अटक, दोन पीडित महिलांची सुटका!

0
IMG-20260526-WA0040

बुलढाणा (एकनाथ माळेकर) : मलकापूर शहरातील महावीर नगर भागात घरामध्ये सुरू असलेल्या देहविक्रीच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने रविवारी (दि. २५) सायंकाळी धडक कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी एका महिला एजंटसह तिघांना रंगेहाथ अटक केली असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी रोकड, मोबाईल आणि सौंदर्य प्रसाधनांसह एकूण ३३,१६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील महावीर नगर भागात राहणारी एक ४८ वर्षीय महिला आपल्या राहत्या घरात बाहेरून महिला आणून त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होती. या कुंटणखान्यामुळे परिसरातील नागरिक अत्यंत त्रस्त होते व त्यांच्यात तीव्र असंतोष पसरला होता. या संदर्भात पोलिसांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली होती.बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांनी एक विशेष पथक तयार केले. परि. पोलीस उपअधीक्षक श्री. सागर कदम व सपोनि. यशोदा कणसे यांच्या नेतृत्वातील या पथकाने २५ मे रोजी महावीर नगरमधील संबंधित महिलेच्या घरावर छापा टाकला.या कारवाई दरम्यान, ४८ वर्षीय मुख्य महिला आरोपी तिचा साथीदार (एजंट) संतोष हरीभाऊ वाघ (वय ३२, रा. संत ज्ञानेश्वरनगर, मलकापूर)याच्या मदतीने दोन पीडित महिलांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच घटनास्थळावरून पोलिसांनी उखर्डा पांडुरंग तांदुळकर (वय ३८, रा. पवनसुतनगर, गाडेगांव मंदीर, मलकापूर) या ग्राहकालाही ताब्यात घेतले.पोलिसांनी घटनास्थळावरून खालील मुद्देमाल जप्त केला आहे: ३ नग मोबाईल (किंमत ३०,०००/- रुपये) नगद रोकड (२,५००/- रुपये) सौंदर्य प्रसाधने व इतर साहित्य ३३,१६५/- रुपये.या प्रकरणी परि. पोलीस उपअधीक्षक श्री. सागर यशवंत कदम यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा, १९५६ (PITA Act) चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मा.श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक (खामगाव) श्री. श्रेणिक लोढा, अपर पोलीस अधीक्षक (बुलढाणा) श्री. अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी (मलकापूर) श्री. आनंद महाजन यांच्या सूचनेनुसार करण्यात आली.या कारवाईत पोनि. श्री. सुनील अंबुलकर, सपोनि. यशोदा कणसे, तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, सतीश हातळकर, विजय वारुळे, अमोल वणारे, मंगेश सनगाळे, कोमल इंगळे, दिपाली चव्हाण, समाधान टेकाळे, वैभव निंबाळकर व कोसे मो.प.वि. बुलढाणा यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!