घाटपुरी येथील जगदंबा देवी मंदिरातील चोरीचा गुन्हा उघड; अकोल्याच्या आरोपीला ठोकल्या बेड्या…

0
IMG-20260526-WA0046

खामगाव (एकनाथ माळेकर):तालुक्यातील प्रसिद्ध व श्रद्धास्थान असलेल्या जगदंबा देवी संस्थान, घाटपुरी येथील मंदिरात झालेली धाडसी चोरी उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलढाणा व शिवाजीनगर पोलिसांच्या पथकाला मोठे यश आले आहे. याप्रकरणी अकोला जिल्ह्यातील रिधोरा येथील एका ३९ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तब्बल ३ लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची लगट जप्त करण्यात आली आहे.२४ डिसेंबर २०२५ च्या रात्री ९:०० वाजेपासून ते २५ डिसेंबर २०२५ च्या सकाळी ६:०० वाजेदरम्यान अज्ञात चोरट्याने घाटपुरी येथील जगदंबा देवी मंदिराच्या खिडकीचे लोखंडी गज तोडून आत प्रवेश केला होता. चोरट्याने गाभाऱ्यात प्रवेश करून देवी व गणपतीच्या अंगावरील अंदाजे ७३ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ३९७/२०२५, कलम ३३१(४), ३०५ भारतीय न्याय संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा (LCB) बुलढाणा करत होती. तपासादरम्यान पोलीस पथकाने घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे आणि सायबर सेलची मदत घेतली. दरम्यान, एलसीबीच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी अमोल काशीराम तेलगोटे(वय ३९ वर्षे, रा. रिधोरा, ता. जि. अकोला) याला ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीने चोरलेल्या दागिन्यांची बनवलेली २० ग्रॅम २० मिली वजनाची सोन्याची लगट (किंमत ३ लाख २० हजार रुपये) पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केली आहे. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून, त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव यांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा श्री. अमोल गायकवाड सर,अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्री. श्रेणिक लोढा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर सर यांच्या आदेशानुसार करण्यात आली.कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पी.एस.आय. पंकज सपकाळे, ए.एस.आय. राजेंद्र अंभोरे, महिला पोलीस अंमलदार वनिता शिंगणे, पोलीस अंमलदार अमोल शेजोळ, अजिस परसुवाले, मनोज खर्डे, शिवानंद हेलगे आणि कैलास ठोंबरे (TAW) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे घाटपुरी परिसरातील नागरिकांनी व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!