आत्मा अंतर्गत सवणा येथे नैसर्गिक शेतीशाळा संपन्न..
चिखली (एकनाथ माळेकर)कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) खरीप हंगाम अंतर्गत मौजे सवणा येथे दिनांक २६/०५/२०२६ ला चंदनशेष महाराज संस्थान, सवणा येथे नैसर्गिक शेतीशाळा कार्यक्रम संपन्न झाला. दिवसेंदिवस वाढता रासायनिक खताचा प्रभाव, कीटकनाशक औषधी इ. मुळे शेतीवर व मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होत आहे. उत्पादन पूर्व खर्च वाढत असल्यामुळे शेतीमध्ये आर्थिक उत्पन्न कमी होत आहे.सदर शेतीशाळेमध्ये शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नैसर्गिक / सेंद्रिय पद्धतीने शेती करावी तसेच शेणखत, बायोडायनॅमिक पद्धतीने कंपोस्ट खत, दशपर्णी अर्क, जीवामृत, बीजामृतचा वापर कसा करावा याबद्दल श्री. योगेश सोनुने (सेंद्रिय तज्ज्ञ प्रशिक्षक) यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. सेंद्रिय शेतीचे महत्त्व, त्याचे नियोजन, प्रमाणिकरण याबाबात श्री. सिताफे (उप कृषी अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले.तसेच खरीप हंगाम पूर्व नियोजन, बियाणे, औषधी खताचा समतोल वापर, हुमणी अळी नियंत्रण याबाबत श्री. विजय चिंचोले (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी मार्गदर्शन केले. हुमणी अळी नियंत्रण, A.I ॲपचा वापर, सेंद्रिय शेतीबद्दल श्री. सचिन काळे (तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, चिखली) यांनी माहिती दिली.शेतकऱ्यांनी घरचे बियाणे वापरावे, त्यापूर्वी बीज उगवण तपासणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक सह माहिती श्री. निसार खान (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक) यांनी दिली.श्री. विजय हिंमतराव भुतेकर यांनी सर्व शेतकरी यांनी खरीप हंगामापासून जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठांचाच वापर व निर्मिती करून सेंद्रिय शेती करावी याबाबत आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्री. खान यांनी व आभार प्रदर्शन श्री. विजय भुतेकर यांनी केले. यावेळी सवणा गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
