हतेडी बु. प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘हिवताप प्रतिरोधक महिना’ साजरा; नागरिकांना आरोग्यविषयक खबरदारीचे आवाहन…..

0
IMG-20260629-WA0004

बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज ):राज्य शासनाच्या वतीने १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘हिवताप प्रतिरोधक महिना’ साजरा करण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत हतेडी बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ‘समग्र प्राथमिक आरोग्य सेवा’ (CPHC) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आरोग्य विभागाकडून परिसरातील नागरिकांमध्ये हिवताप प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत व्यापक जनजागृती करण्यात आली.२२ ते २५ जून दरम्यान पार पडलेल्या या प्रशिक्षणाचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी (बुलढाणा) डॉ. महेंद्र सरपाते आणि तालुका आरोग्य अधिकारी (मोताळा) डॉ. जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी हतेडी बु. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ आणि डॉ. कविता नागलकर उपस्थित होते.कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहनआरोग्य पथकाने नागरिकांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ‘आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन केले. यामध्ये घरातील पाण्याचे रांजण, टाक्या, कुलर, फ्लॉवर पॉट, फ्रिजमागील ट्रे आणि घराजवळील भंगार किंवा टायरमध्ये साचलेले पाणी आठवड्यातून एकदा रिकामे करून ते घासून स्वच्छ करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच, संथ पाण्यात डासांच्या अळ्यांचा नायनाट करण्यासाठी ‘गप्पी माशांचा’ वापर करण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले.थंडी वाजून ताप येणे, तीव्र डोकेदुखी, अंगदुखी आणि उलट्या ही हिवतापाची प्रमुख लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास अंगावर न काढता त्वरित आशा सेविका किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन मोफत रक्त तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.आरोग्य केंद्राच्या ओपीडीमध्ये माहितीपर पोस्टर्स व पत्रके लावून जनजागृती करण्यात आली. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून राबविल्या जाणाऱ्या ‘कंटेनर सर्वेक्षणास’ नागरिकांनी सहकार्य करावे, अशी विनंती आरोग्य विभागाने केली आहे. कार्यक्रमाच्या यशासाठी स्थानिक आरोग्य निरीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!