दुसरबीड येथे ईद-ए-मिलादुन्नबी मोठ्या उत्साहात साजरी
सिंदखेड राजा (अनिल दराडे)
शांतता, समता आणि बंधुभावाचा संदेश जगभरात पोहोचविणारे हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलादुन्नबी दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुसरबीड येथे मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
सकाळपासूनच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हजारो लोकांच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकीत बसस्थानकावर समाजाकडून पोहे-जलेबीचा नाश्ता देण्यात आला. तसेच खजूर, खीर यांचे वाटप करून ऐक्य व भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास सिंदखेडराजा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, गावातील विविध पक्षांचे नेते तसेच सर्व धर्मीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा दिल्या.
या मिरवणुकीचे आयोजन तंटामुक्ती समिती अध्यक्ष याकूब शेख, अनिस मिया शेख, रियाज साबीर पठाण, शेख शकील, शेख निसार, शेख रफिक, हलीम खा पठाण व सहकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. मिरवणुकीस गावकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला.
मिरवणूक शांततेत व सुरक्षिततेत पार पाडण्यासाठी किनगाव राजा पोलीस ठाण्याचे ठाणेदार मातोडकर साहेब व पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न केले.
