युवा शेतकरी गणेश वाघमारे यांनी शेतीनिष्ठ बैला सोबत केला वाढदिवस साजरा. चिखली एकनाथ माळेकर चिखली तालुक्यातील मौजे कवठळ येथिल शेतकर्यांचा अनोखा उपक्रमवाढदिवसानिमित्त केला बैलांचा रौप्यमहोत्सव व कृतज्ञता सोहळा साजरा.
चिखली ( एकनाथ माळेकर)वाढदिवसाचा केक कापून किंवा इतर खर्चिक पद्धतीने साजरा करण्याऐवजी, कवठळ येथील युवा शेतकरी गणेश वाघमारे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी गेली २५ वर्षे आपल्या कुटुंबाला आणि शेतीला अविरत साथ देणाऱ्या ‘गुण्या’ नावाच्या बैलाचा ‘रौप्य महोत्सवी कृतज्ञता सोहळा’ साजरा केला. या सोहळ्याला गावकरी, मित्रमंडळी आणि परिसरातील शेतकऱ्यांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यंत्रयुगातही माणुसकीचा धागा कसा जपता येतो, याचे उत्तम उदाहरण या सोहळ्याने दाखवून दिले.
वाघमारे सांगतात की, ही शिकवण त्यांना त्यांच्या आजोबांकडून (कै. ह.भ.प. जगन्नाथबुवा थिगळे) यांच्याकडून मिळाली. एकेकाळी त्यांच्याकडील ‘बुध्या’ नावाच्या बैलाचा सर्पदंशाने मृत्यू झाला होता. त्यावेळी इतरांसारखं त्याला फेकून न देता, आजोबांनी स्वतःच्या शेतात त्याला सन्मानाने पुरून टाकले. “आपल्या कुटुंबातील कोणाला असं फेकून देणार का? ही सगळी गुरंढोरं माझ्या कुटुंबाचा भाग आहेत आणि त्यांचा सन्मान करायलाच पाहिजे,” असे आजोबांचे शब्द आजही माझ्या हृदयावर कोरले आहेत, असे वाघमारे सांगतात. हा बैल वाघमारे यानां पंचवीस वर्षांपूर्वी त्यांचे मामा व आजीकडून पशुधनभेट म्हणून मिळाला होता. आजीच्या विश्वासाला पात्र ठरत, पुढे याच बैलाने त्यांच्या आयुष्याला आणि शेतीला समृद्धी दिली. ही केवळ एक बैलजोडी नसून, कुटुंबाचा आधार बनली आहे. त्यामुळे या वर्षीचा वाढदिवस गणेश वाघमारे यांनी आपल्या वाढदिवसाचा केक न कापता, हा कृतज्ञता सोहळा साजरा करून ‘गुण्या’प्रती आणि आपल्या कुटुंबाच्या मूल्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या सोहळ्यादरम्यान गोठ्यावर ‘गुण्या’ बैलाची पारंपरिक पद्धतीने पूजा करण्यात आली, त्याला पुष्पहार घालण्यात आला आणि पुरणपोळीचा नैवेद्यही दाखवण्यात आला. उपस्थित गावकऱ्यांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल वाघमारे कुटुंबाचे कौतुक केले. हा सोहळा केवळ एका प्राण्याचा सन्मान करण्याचा नसून, कुटुंबाच्या नैतिक मूल्यांचे आणि माणुसकीचे नाते जपण्याचा एक अनोखा प्रयत्न होता. हा उपक्रम समाजाला एक सकारात्मक संदेश देतो की, प्राण्यांना केवळ साधन न मानता, कुटुंबाचा अविभाज्य भाग म्हणून स्वीकारायला हवे.
