शेतकऱ्यांच्या हितासाठी श्वेता ताई महाले यांची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी…शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणारी प्रत्येक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहचवण्यास कटीबद्ध.. आ. सौ. श्वेता महाले…..
चिखली( निलेश कोल्हे)चिखली शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या आमदार सौ. श्वेता महाले यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा प्रश्न राज्य सरकारपुढे मांडला आहे. “महा DBT पोर्टलवर सुरू असलेल्या राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना 2025, कृषी उप अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेची अंतिम तारीख 22 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे. परंतु 23 सप्टेंबर पासून नवीन GST लागू होणार असून त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी अवजार खरेदीची तारीख नवीन GST लागू होईपर्यंत वाढवावी,” अशी मागणी आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आमदार महाले म्हणाल्या की, “कृषी अवजार खरेदीवर GST मधील बदलांचा मोठा परिणाम होणार आहे. GST कमी झाल्यास शेतकऱ्यांना अवजार खरेदीत थेट आर्थिक लाभ मिळेल. अशा वेळी योजनांची अंतिम तारीख पुढे ढकलली तर शेतकरी कमी दरात अवजार खरेदी करून त्यांचा फायदा घेऊ शकतील. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून ही तारीख वाढवणे आवश्यक आहे.”
शेतकऱ्यांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करताना त्या म्हणाल्या, “शेतकरी हा आपल्या समाजाचा कणा आहे. आपल्या शेतकऱ्यांनी घाम गाळून राष्ट्राचे पोट भरले आहे. त्यांच्या प्रत्येक अडचणीशी मी वैयक्तिकरित्या जोडलेली आहे आणि त्यांच्या हक्कासाठी लढणे ही माझी जबाबदारी आहे. शेतकऱ्यांचा प्रत्येक लाभ, प्रत्येक सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”
शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सातत्याने आवाज उठवणाऱ्या श्वेता ताई महाले यांच्या या पुढाकाराचे शेतकरी वर्गातून स्वागत होत असून त्यांना आपल्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची संवेदनशील जनप्रतिनिधी अशी ओळख मिळत आहे.
