डॉ. शिंगणे यांचे ‘जवळचे’ श्याम मेहेत्रे घरदार बदलत ‘घड्याळात!नगरपरिषद निवडणुकीआधीच राजकीय भूकंप; एनसीपी शरद पवार गटाला जबर धक्का, समीकरणे पूर्णतः बदलली

IMG-20251107-WA0018

सिंदखेड राजा(अनिल दराडे) सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आज घडलेली एकच घटना संपूर्ण राजकीय वर्तुळाला ढवळून काढणारी ठरली आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे जवळचे, विश्वासू आणि नगरपरिषद अध्यक्षपदाचे ‘फ्रंट लाइन’ दावेदार श्याम मेहेत्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) सोडत थेट अजित पवार यांच्या गटाचे घड्याळ चिन्ह हातात धरले आहे.
मेहेत्रेंचा हा पक्षांतर सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या पक्ष कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मोठ्या गर्दीत आणि उत्साहात पार पडला. मेहेत्रेंच्या आगमनाने ‘घड्याळ’ गटात नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांचा जल्लोष अक्षरशः उसळला.
शिंगणे गटाला मोठा तडा
श्याम मेहेत्रे हे सिंदखेड राजा शहरातील प्रभावी जनसंपर्क, संघटन कौशल्य आणि निवडणूक गणित हाताळण्यात तरबेज नेते म्हणून ओळखले जातात. नगरपरिषद अध्यक्षपदासाठी त्यांचे नाव आघाडीवर असल्याने, त्यांच्या अचानक घरवापसीने शरद पवार गटात मोठी खळबळ माजली आहे. डॉ. शिंगणे यांच्या गटाला हा जबर धक्का मानला जात असून, त्यांच्या संपूर्ण रणनीतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
निवडणुकीचे चित्र पालटणार
या बंडखोरीनंतर सिंदखेड राजा नगरपरिषद निवडणुकीचे समीकरण पूर्णतः बदलले आहे. अजित पवार गटाने शहरात मोठी राजकीय खिंड मोकळी केली असून, त्यांच्या बाजूने आता वारे वाहू लागल्याची चर्चा सुरू आहे. मेहेत्रेंच्या प्रवेशामुळे शहरातील राजकीय आघाड्यांचे गणित नव्याने मांडावे लागणार, अशी प्रतिक्रिया स्थानिक राजकारणात उमटत आहे.
आता पुढे काय?
सिंदखेड राजातील निवडणूकपूर्व वातावरणात यामुळे अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. गटबाजी, नवे आघाडी-जोडे, उमेदवारांची उलटापालट आणि राजकीय हालचाली येत्या काही दिवसांत अधिक तीव्र होणार आहेत. मेहेत्रेंच्या पावलाने ही निवडणूक अधिक रंगतदार व चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.

You may have missed

error: Content is protected !!