महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती व समविचारी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने संविधान बांधिलकी महोत्सवास प्रारंभ
अमरावती:-संविधान दिनानिमित्त मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अमरावती, संविधान जागर अभियान, राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय अमरावती, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटन तसेच विविध समविचारी संस्था व संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान बांधिलकी महोत्सव २०२५-२०२६ च्या सुरुवातीचा कार्यक्रम संपन्न झाला. या अंतर्गत संविधान प्रास्तविका वाचन, संविधानावरील पोस्टर प्रदर्शन व उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख (जिल्हाअध्यक्ष महा. अनिस. अमरावती) उपस्थित होत्या. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. डी. आर. बांबोळे (समन्वयक – गुणवत्ता हमी कक्ष), प्रा. योगेश सोळंके, डॉ. मंदा नांदुरकर (विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग व विवेकवाहिनी कार्यवाह – महा. अनिस. अमरावती), प्रफुल्ल कुकडे (कार्याध्यक्ष महा. अनिस. अम.), विजय डवरे (प्रधान सचिव महा. अनिस. अम.), तसेच नरेंद्र धर्माळे (महा. अनिस. अम.) यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. योगेश सोळंके यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांमार्फत संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन घडवून आणत त्यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी, युवकांनी व कार्यकर्त्यांनी संविधानातील लोकशाही मूल्यांचे स्मरण ठेवत एकमुखाने भारतीय संविधानाची प्रास्तविका वाचून बांधिलकी व्यक्त केली.
त्यानंतर महा. अनिस. अमरावती चे कार्याध्यक्ष प्रफुल्ल कुकडे यांनी संविधान बांधिलकी महोत्सवाच्या कालावधीत (दि. 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारी) आयोजित होणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. त्यांनी या काळात घेण्यात येणाऱ्या दोन विशेष निबंध स्पर्धांची घोषणा केली —
- “भारतीय संविधानाने महिलांना काय दिले” आणि
- “भारतीय संविधानातील मूल्ये”
महा. अनिस. प्रधान सचिव विजय डवरे यांनी संविधानाचे महत्त्व व मूल्ये अधोरेखित करत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख यांनी संविधान बांधिलकी महोत्सव व पोस्टर प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन जाहीर करत सांगितले की,
“भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांचे जिवंत दर्शन आहे. संविधानातील मूल्यांची अंमलबजावणी ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. मंदा नांदुरकर, प्रा. श्रेयस काळमेघ, डॉ. शालिनी वाटाने, डॉ. शर्मिला कुबडे, डॉ. रुपेश कावळे, डॉ. मंगेश देशमुख यांनी सक्रिय परिश्रम घेतले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संविधानावरील निष्ठा प्रकट करत सर्वांनी एकमुखाने
“भारतीय संविधानाचा विजय असो!”
असा जयघोष केला.
कार्यक्रमाचे संयोजन व संचालन श्रेयस काळमेघ यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. मंदा नांदुरकर यांनी केले.
