विवेकानंद विद्यालयात आषाढी एकादशी सोहळा उत्साहात साजरा
लोणार (यासीन शेख): विवेकानंद विद्या मंदिर व विवेकानंद प्री-स्कूल लोणार येथे आज मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी सोहळा संपन्न झाला. या पावन प्रसंगी शाळेचे संपूर्ण परिसर ‘विठ्ठल नामाचा जयघोष’ आणि टाळ-मृदंगाच्या निनादाने भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या कार्यक्रमास विवेकानंद प्री-स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. केला मॅडम, विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. तट्टे मॅडम तसेच माजी मुख्याध्यापिका सौ. कुळकर्णी मॅडम यांची विशेष उपस्थिती लाभली. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुख्मिणी व वारकरी वेशभूषा परिधान करून दिंडीत सहभागी होत वातावरण अजूनच भक्तिमय केले. टाळ, मृदुंगाच्या गजरात आणि ‘विठू माऊलीच्या जयघोषात’ विठ्ठलाची पालखी संपूर्ण शाळाभर फिरली. या सोहळ्याला पालकवर्गानेही उत्स्फूर्तपणे हजेरी लावून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. हा भक्तिमय सोहळा विद्यार्थ्यांच्या संस्कारांच्या जडणघडणीस निश्चितच प्रेरणादायी ठरला.
शाळेच्या शिक्षिका सौ. पाठक मॅडम, इंगळे मॅडम, वाघ मॅडम, पांडे मॅडम, सुषमा कुळकर्णी मॅडम, शेटे मॅडम, काळे मॅडम, अवसरमोल मॅडम व प्रियंका मॅडम यांनी पारंपरिक मराठमोळ्या वेशभूषेत सहभागी होत वारकरी परंपरेचा सन्मान राखला.तसेच या भक्तिमय वारीला सर्व पुरुष शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची साथ लाभली.
