रस्ता सुरक्षा ही काळाची गरज; तरुणांनी नियम पाळून जीव वाचवावा,नारायणराव नागरे महाविद्यालयात रस्ता सुरक्षा विषयावर एकदिवसीय भव्य कार्यशाळा संपन्न

IMG-20260117-WA0005

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबीड येथील नारायणराव नागरे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा या अत्यंत ज्वलंत व समाजासाठी महत्त्वाच्या विषयावर एकदिवसीय भव्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. वाढती वाहनसंख्या, बेदरकार वाहनचालना व वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा अत्यंत समयोचित ठरली.
या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक व उद्घाटक म्हणून पोलीस निरीक्षक (API) श्री. मातोंडकर साहेब यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रस्ता सुरक्षा ही केवळ नियमांची बाब नसून ती जीवनमूल्यांची जाणीव करून देणारी जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे पालन केल्यास केवळ स्वतःचेच नव्हे, तर इतरांचेही प्राण वाचवता येतात, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मार्गदर्शन करताना त्यांनी हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, वेगमर्यादेचे पालन, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, मद्यपान करून वाहन न चालवणे यासारख्या मूलभूत नियमांचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः तरुण पिढीने क्षणिक उत्साह, स्टंटबाजी व वेगाच्या हव्यासापोटी स्वतःचे आयुष्य धोक्यात घालू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय नागरे (अधिसभा तथा व्यवस्थापन परिषद सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती) हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती ही शिक्षणसंस्थांची सामाजिक जबाबदारी असल्याचे नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर सामाजिक जबाबदारीतही अग्रभागी राहावे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. गणेश घुगे यांनी केले. रस्ता अपघात रोखण्यासाठी जनजागृती, शिस्त व जबाबदार नागरिक घडवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कु. वैष्णवी सानप यांनी अत्यंत प्रभावीपणे केले, तर आभार प्रदर्शन विद्यार्थिनी कु. कल्याणी गीते हिने केले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मार्गदर्शक, डोळे उघडणारी व प्रेरणादायी ठरली असून, समाजात रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवर व विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!