39 भूमिहीन घरकुल लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घरकुल: महसूल व ग्रामविकास विभागाने दिली मान्यता
सिंदखेडराजा( अनिल दराडे) पंचायत समिती सिंदखेडराजा मार्फत घरकुल योजनेमध्ये भूमिहीन लाभार्थ्यांना हक्काचे घरकुल मंजूर करण्याची प्रक्रिया पार पडली.
यासाठी शक्ती प्रदत्त समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये ग्रामपंचायत मधील भूमिहीन लाभार्थ्यांना गावठाणामधील जमिनीवर घरकुलासाठी मंजुरी देण्यात आली. प्राप्त अर्जांपैकी छाननी करून साखरखेर्डा येथील 37 व पिंपळखुटा येथील 2 अशा एकूण 39 पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. तालुक्यातील 39 कुटुंबांना हक्काची जागा व हक्काचे घरकूल या माध्यमातून मिळणार आहे.
या शक्ती प्रदत्त समितीमध्ये अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी संजय खडसे, सचिव म्हणून गटविकास अधिकारी अजित बांगर व सदस्य म्हणून तहसीलदार अजित दिवटे यांनी भूमिका पार पाडली.
बैठकीसाठी नायब तहसीलदार प्रवीण वराडे, विस्तार अधिकारी भास्कर घुगे, राजेश्वर पवार,अमृता शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी चनखोरे, ग्राम महसूल अधिकारी पोंदे इत्यादी उपस्थित होते.
“भूमिहीन लाभार्थ्यांना हक्काची जागा मिळून त्यांच्या पिढ्यांचा संघर्ष संपणार आहे. 39 कुटुंबांना हक्काची जागा व घरकुल मिळणार आहे” उपविभागीय अधिकारी संजय खडसे
“39 कुटुंबांना घरकुलाच्या माध्यमातून कायमचा हक्काचा निवारा मिळणार आहे. त्यांना घरकुल मिळत आहे याचा आनंद आहे” अजित बांगर गटविकास अधिकारी
