दृश्यम’चा थरार मेहकरमध्ये: चार वर्षांपूर्वीचा ‘परफेक्ट मर्डर’ पत्नीच्या एका तक्रारीमुळे उघड!​

0
1776858132730

मेहकर ( बुलढाणा माझा न्युज ) :बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी करण्यात आलेला एका ३४ वर्षीय युवकाचा निर्घृण खून आणि त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सिमेंटच्या कोब्याखाली गाडण्याचा ‘दृश्यम’ चित्रपटाला लाजवेल असा कट अखेर उघडकीस आला आहे. आरोपीच्या पत्नीने घरगुती वादातून पोलिसांकडे पतीचे बिंग फोडल्याने या धक्कादायक हत्याकांडाचा खुलासा झाला.​मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२२ मध्ये विनोद अश्रुबा नवले या युवकाची हत्या करण्यात आली होती. आरोपी सचिन ज्ञानेश्वर उगले आणि त्याचा साथीदार सुनील बाजीराव जाधव (रा. सुकळी) यांनी मिळून हा कट रचला. मेहकर-मोळा रोडवरील ‘हॉटेल पैलवान’ येथे विनोदला दारू पाजून, नशेमध्ये असताना त्याच्यावर कैची आणि चाकूने वर्मी वार करून त्याला जागीच ठार मारण्यात आले.​१७ एप्रिल २०२६ रोजी आरोपी सचिन उगले याच्या पत्नीने घरगुती त्रासाला कंटाळून मेहकर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आपल्या पतीच्या गुन्हेगारी वृत्तीचा उल्लेख करताना तिने चार वर्षांपूर्वी घडलेल्या या घातपाताचा संशय पोलिसांसमोर व्यक्त केला. पोलिसांनी या माहितीची गांभीर्याने दखल घेत आरोपीवर पाळत ठेवली. पोलिसांचा ससेमिरा वाढत असल्याचे पाहून अखेर मुख्य आरोपी सचिन उगले याने स्वतः पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली.आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत हॉटेलमागील सिमेंटचा कोबा खोदून काढला. यावेळी तिथे एक मानवी सांगाडा आढळून आला. पोलिसांनी सदर सांगाडा ताब्यात घेतला असून तो उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. मयत विनोद नवले याचे भाऊ मनोज उगले यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!