शेतकऱ्याने मुलीच्या शिक्षणासाठी आणलेले ५ लाख चोरणारा आंतरराज्यीय गुन्हेगार गजाआड; बुलढाणा एलसीबीची कर्नाटकात धडक कारवाई

Screenshot_2026-01-29-18-35-17-87_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज )मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी एका शेतकऱ्याने बँकेतून काढलेले ५ लाख रुपये कारची काच फोडून लंपास करणाऱ्या सराईत आंतरराज्यीय बॅगलिफ्टरला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) यश आले आहे. पोलीस पथकाने थेट कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे जाऊन ही कारवाई केली असून चोरलेली ५ लाखांची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.


नेमकी घटना काय?

रिसोड (जि. वाशीम) येथील शेतकरी नितीन जिजेबा पहाड यांची मुलगी श्रुती हिचा बुलढाणा येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये बी.ए.एम.एस. (BAMS) प्रथम वर्षासाठी प्रवेश निश्चित झाला होता. १६ सप्टेंबर २०२५ रोजी पहाड यांनी कॉलेजची फी भरण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेहकर शाखेतून ५ लाख रुपये काढले. पैसे कारमध्ये ठेवून ते कॉलेजमध्ये गेले असता, अज्ञात आरोपींनी कारचा पाठलाग केला आणि कॉलेजच्या पार्किंगमध्ये कारची काच फोडून ५ लाखांची रोकड लंपास केली. याप्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासाची चक्रे फिरली आणि कर्नाटक गाठले

शेतकरी कुटुंबावर झालेल्या या आर्थिक आघाताचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांना तात्काळ तपासाचे आदेश दिले. एलसीबीच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. आरोपी हे आंतरराज्यीय टोळीचे सदस्य असून ते कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथे हायप्रोफाईल वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली.

पोलीस पथकाने शिवमोगा येथे सलग पाच दिवस तळ ठोकला आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुख्य आरोपी सुनील उर्फ बाळू रामू बोवी (वय ३२, रा. भद्रावती, जि. शिवमोगा) याला ताब्यात घेतले.

५ लाखांची रक्कम हस्तगत

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने आपला भाऊ विष्णू रामू बोवी याच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून चोरी गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये जप्त केले आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांत बॅगलिफ्टिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुनील अंबुलकर, पोउपनि अविनाश जायभाये, दीपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, गजानन गोरले, राजू आडवे, पवन मखमले आणि ऋषी खंडेराव यांनी बजावली आहे.

You may have missed

error: Content is protected !!