जलजीवन मिशन की भ्रष्टाचाराचे स्टेशन? दुसरबीड ग्रामस्थांचा संतप्त सवाल.
जलजीवन मिशनचा बोजवारा; अपूर्ण कामावर बिलाची तयारी?
प्रत्येकी ₹१५०० कनेक्शन शुल्काची वसुली, अमरण उपोषणाचा इशारा
सिंदखेड राजा (अनिल दराडे ) “हर घर नल, हर घर जल”चा गाजावाजा करणाऱ्या जलजीवन मिशनची मौजे दुसरबीड येथे अवस्था दयनीय झाली असून, मागील ४ ते ५ वर्षांपासून योजना केवळ कागदावरच जिवंत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गावात आज पर्यंत पाणी नाही, पण नाल्यांचे जाळे मात्र तयार करण्यात आल्याचे वास्तव समोर आले आहे.
गावभर नाल्या खोदून त्यात नावापुरते पाईप टाकण्यात आले, मात्र प्रत्यक्षात पाणीपुरवठा सुरू झालेला नाही. योजना अपूर्ण असताना व अधिकृत ताबा न घेताच ग्रामपंचायतीमार्फत घरगुती नळ कनेक्शन देण्यात आले, एवढेच नव्हे तर नागरिकांकडून प्रत्येकी ₹१००० ते ₹१५०० इतकी रक्कम वसूल करण्यात आल्याचा आरोप अर्जदार अनिल श्रीमंत दराडे यांनी केला आहे.
सदर पाणीपुरवठा योजना अद्याप पूर्ण न झालेली असताना ठेकेदाराचे बिल अदा करण्याची हालचाल सुरू असल्याची चर्चा गावात रंगू लागली असून, हे बिल अदा झाल्यास संपूर्ण जबाबदारी पाणीपुरवठा विभागावर राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.
या प्रकरणी ठेकेदाराच्या कामाची सखोल चौकशी करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच भविष्यात अशा ठेकेदारास कोणतेही शासकीय काम देऊ नये, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, तात्काळ कारवाई न झाल्यास कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा थेट इशारा देण्यात आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे.
जलजीवन मिशनसारख्या महत्वाकांक्षी योजनेचा गावागावात फज्जा उडत असताना जबाबदार अधिकारी व लोकप्रतिनिधी गप्प का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. दुसरबीडमध्ये पाणी नसलेली नळयोजना नेमकी कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
जलजीवन मिशन – पाणी नाही, पण वसुली सुरू!
योजना अपूर्ण, तरीही कनेक्शन दिले जात असल्याने गरीब ग्रामस्थांची खुलेआम आर्थिक लूट होत असल्याचा आरोप.
