दुसरबिडमध्ये जिओचे नेटवर्क ‘गुल’; लग्नसराईत नातेवाईकांचे हाल तर व्यापाऱ्यांना बसला आर्थिक फटका !
दुसरबिड (अनिल दराडे)सिंदखेडराजा तालुक्यातील दुसरबिड आणि परिसरात रिलायन्स जिओ (Jio) कंपनीची सेवा गेल्या दोन दिवसांपासून अचानक कोलमडल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज लग्नाचा मोठा मुहूर्त असतानाच नेटवर्क गायब झाल्याने वऱ्हाडी मंडळींना एकमेकांशी संपर्क साधताना अतोनात त्रास सहन करावा लागला. सकाळी ७वाजेपासून बंद पडलेले नेटवर्क सायंकाळपर्यंत पूर्ववत न झाल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.आज लग्नाची मोठी तिथी असल्याने परिसरात मोठी वर्दळ होती. मात्र, मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे पाहुण्यांना लोकेशन मिळवणे, मंगल कार्यालयातील लोकांशी संवाद साधणे आणि बाहेरगावच्या नातेवाईकांशी संपर्क करणे अशक्य झाले. अनेक महत्त्वाचे निरोप वेळेवर न पोहोचल्याने लग्नकार्यात मोठा गोंधळ उडाला.डिजिटल व्यवहार ठप्प; व्यापाऱ्यांचे नुकसानः आजच्या डिजिटल युगात बहुतांश आर्थिक व्यवहार ‘UPI’ आणि ‘ऑनलाईन पेमेंट’वर अवलंबून आहेत. नेटवर्क नसल्याने दुकानांवरील स्कॅनर आणि पेमेंट मशीन्स बंद पडल्या. यामुळे सकाळपासून व्यापाऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, ग्राहकांनाही रिकाम्या हाती परतावे लागले.नेटवर्क अभावी परिसरातील बँका आणि नेट कॅफेमधील कामे पूर्णपणे ठप्प झाली होती. शासकीय कामांसाठी आलेल्या नागरिकांना दिवसभर ताटकळत उभे राहून अखेर माघारी फिरावे लागले.”आम्ही वेळेवर महागडे रिचार्ज करतो, मग कंपनी आम्हाला वेळेवर सेवा का देत नाही?” असा सवाल संतप्त ग्राहकांनी उपस्थित केला आहे. कंपनीकडून तांत्रिक बिघाडाबाबत कोणतीही पूर्वसूचना किंवा मेसेज न आल्याने ग्राहकांमध्ये अधिक संभ्रम आहे. शेंदुर्जन आणि दुसरबिड परिसरात जिओचे मोठे ग्राहक जाळे आहे. कंपनीने हा तांत्रिक बिघाड त्वरित दुरुस्त करावा, अन्यथा ग्राहक सामूहिक रित्या दुसऱ्या कंपनीत ‘पोर्ट’ होतील, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
