झेडपी शिक्षकाची ‘कमाल’; प्लास्टिक पाईपपासून बनवले अनोखे ‘गणकयंत्र’!खामगावच्या कदमापूर शाळेतील राजेश कोगदे यांचा प्रयोग; वर्गातील ३८ पैकी ३८ मुले गणितात ‘सुपरफास्ट’….
बुलढाणा/खामगाव ( बुलढाणा माझा न्युज ):आजच्या डिजिटल युगात गणिताची भीती घालवण्यासाठी महागड्या सॉफ्टवेअर्सचा वापर केला जातो. मात्र, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कदमापूर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक राजेश कोगदे यांनी चक्क टाकाऊ प्लास्टिक पाईपपासून एक अभिनव ‘गणकयंत्र’ (Calculator) तयार केले आहे. या यंत्राच्या मदतीने गणितात ‘ढ’ समजला जाणारा विद्यार्थीही आता आनंदाने बेरीज-वजाबाकी करू लागला असून, त्यांच्या वर्गातील १०० टक्के मुले गणितात प्रगत झाली आहेत.कोगदे सरांनी बनवलेल्या या गणकयंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याला चालवण्यासाठी कोणतीही बॅटरी किंवा विजेची (Electricity) गरज नाही. केवळ प्लास्टिक पाईपच्या कल्पक रचनेतून त्यांनी हे तंत्र विकसित केले आहे. हे यंत्र एखाद्या शिक्षकाप्रमाणे काम करते. विद्यार्थी जेव्हा यावर गणित सोडवतात, तेव्हा उत्तर बरोबर आहे की चूक, हे त्यांना स्वतःहून तपासून पाहता येते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गणिताची मोठी भीती असते. ही भीती घालवण्यासाठी कोगदे सरांनी ‘खेळातून शिक्षण’ (Activity Based Learning) हा मार्ग निवडला. या यंत्राच्या वापरामुळे मुलांमध्ये गणिताची गोडी निर्माण झाली आहे. कोगदे यांच्या वर्गात ३८ मुले असून, या सर्वांना आता गणित हा विषय आवडू लागला आहे. ३८ पैकी ३८ विद्यार्थी गणितात प्रगत असून एकही विद्यार्थी मागे नाही, असा दावा त्यांनी केला आहे.”जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात आणि शिक्षणाधिकारी विकास पाटील यांच्यासारख्या प्रेरणादायी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभल्यामुळेच असे नवनवीन प्रयोग करणे शक्य झाले आहे. हे यंत्र केवळ एक वस्तू नसून मुलांच्या प्रगतीचे साधन ठरले आहे.”— राजेश कोगदे (उपक्रमशील शिक्षक, कदमापूर)पालकांकडून कौतुकाचा वर्षावजिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दाखवलेल्या या कल्पकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षण कशा प्रकारे दर्जेदार होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण कोगदे सरांनी घालून दिले आहे. या यंत्राचा वापर आता इतर शाळांमध्येही पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवावा, अशी मागणी शिक्षणप्रेमींकडून होत आहे.
