किनगाव राजात बँक ऑफ महाराष्ट्रच्या कारभाराविरोधात संताप उसळला!५ मार्च रोजी दुपारी २ वाजताची घटना; पासबुक नसल्याने पैसे ट्रान्स्फर नाकारले!आरबीआय व अकोला येथील झेडएमकडे तक्रार दाखल करण्याचा इशारा
सिंदखेडराजा (अनिल दराडे) तालुक्यातील किनगाव राजा येथील आज दिनांक ५ मार्च रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रच्या किनगाव राजा शाखेत घडलेल्या प्रकाराने ग्राहक सेवेलाच काळिमा फासल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. पासबुक नसल्यास खात्यातील रक्कम दुसऱ्या खात्यात वर्ग करता येणार नाही, असा नियम सांगत कशिअरने व्यवहार नाकारल्याने संताप व्यक्त होत आहे.
नेमकी घटना काय?
निमगाव वायाळ येथील पत्रकार सुरेश हुसे हे दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम ट्रान्स्फर करण्यासाठी शाखेत गेले असता, संबंधित कशिअरने “पासबुक आणा, नाहीतर पैसे ट्रान्स्फर होणार नाहीत. थंबने पैसे काढा,” असे सांगून व्यवहार करण्यास नकार दिला.मात्र काही वेळाने शाखेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने हस्तक्षेप करत आधार कार्ड लिंक असल्यास व्यवहार करता येतो, असे स्पष्ट केले. त्यानंतरच संबंधित रक्कम वर्ग करण्यात आली.या घटनेमुळे शाखेतील कर्मचाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आणि नियमांच्या नावाखाली ग्राहकांची अडवणूक होत असल्याचा आरोप होत आहे.
एटीएम कायम कोरडे!
दरम्यान, शाखेबाहेरील एटीएममध्ये नेहमीच रोख रक्कम नसल्याने नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, जेष्ठ नागरिक व महिलांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.*तक्रारीचा इशारा*सदर प्रकाराबाबत आपण लवकरच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) तसेच अकोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या झोनल मॅनेजर (ZM) कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सुरेश हुसे यांनी दिली आहे. ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्राहक सेवा देणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकेत अशा प्रकारे मनमानी होत असेल, तर सर्वसामान्यांनी न्याय कुठे मागायचा? असा प्रश्न आता किनगाव राजा परिसरात उपस्थित केला जात आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही काही नागरिकांनी दिला आहे.आता आरबीआय व झोनल कार्यालय याची दखल घेऊन कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
