सिंदखेडराजा तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात नागरिकांची गैरसोय; बसण्याची सुविधाच नाही…..
प्रतिनिधी : रवि ढवळे
सिंदखेडराजा:- येथील तहसील कार्यालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. सिंदखेडराजा तालुक्यातील विविध गावांमधून नागरिक राशन कार्डसह इतर शासकीय कामांसाठी तहसील कार्यालयात येत असतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसात महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग नागरिक मोठ्या संख्येने या विभागात येत असतात, मात्र त्यांच्यासाठी बसण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने नागरिकांना उभे राहूनच तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे.

याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस व्यवस्था करण्यात आलेली नाही. अनेक वेळा कामासाठी आलेल्या नागरिकांना “नेटची रेंज नाही”, “नेटचा प्रॉब्लेम आहे” अशी कारणे सांगून काम पुढे ढकलले जात असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. महिला व अपंग नागरिकांना देखील बसण्यासाठी खुर्च्यांची सोय नसल्याने त्यांची अधिकच गैरसोय होत आहे. यासंदर्भात अन्न व नागरी पुरवठा विभागातील अधिकारी पवन भास्कर गांजरे यांना विचारणा केली असता त्यांनी “येथे खूप लोक येतात, कोणा कोणाला खुर्च्या देणार” असे उत्तर दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने नागरिकांसाठी किमान बसण्याची व्यवस्था तसेच नेट समस्येवर तात्काळ तोडगा काढावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.
